You are currently viewing जागतिक पर्यटन दिवस विशेष…

जागतिक पर्यटन दिवस विशेष…

कोंकण पर्यटन नव्या संधी, नव्या दिशेच्या शोधात…

संपादकीय…..

कोरोनाच्या संकटामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णतः कोसळला. अलीकडेच खुल्या झालेल्या राज्यांच्या सीमांमुळे कोकणात पुन्हा एकदा पर्यटन बहरणार अशा आशा दिसू लागल्या आहेत. कोकणातील पर्यटन व्यावसायिक सावधगिरीने कोकणचे पर्यटन पुन्हा नव्याने पुढे नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कोरोनाने संपूर्ण देशातच हादरा दिलाच, परंतु महाराष्ट्र सर्वात जास्त संकटात दिसून आला होता. कोंकण हा महाराष्ट्राचा गोव्याकडील सीमेवरचा प्रांत. गेली कित्येक वर्षे गोव्यात बहरलेला पर्यटन व्यवसाय मागच्या काही वर्षात सिंधुदुर्गात रुजू लागला होता. कोकणातील शेती, बागायती नंतर रोजगारात क्रांती घडवून आणण्याची क्षमता असणारा तसेच कोकणात नुकताच आकार घेत असलेला पर्यटन व्यवसाय कोरोनाच्या संकटाने पार कोलमडून पडला. कर्ज काढून व्यवसाय उभे केलेले व्यावसायिक मेटाकुटीस आले. त्यामुळे कोकणच्या पर्यटनाला आस लागली आहे ती नवी दिशा देण्याची, नव्याने पुन्हा एकदा पर्यटन व्यवसाय डौलाने उभारण्याची.


कोरोनामुळे संपूर्ण देश आर्थिक संकटात आहे, कारखानदारी, उद्योगधंदे, व्यापार, सर्वच आर्थिक संकटात आलेत. अशावेळी देशात, कोकणात जर कोणता व्यवसाय लवकर उभारी घेईल आणि रोजगार, उत्पन्न देईल तर तो केवळ पर्यटन व्यवसाय. परंतु केवळ हॉटेल आणि रिसॉर्टची दालने खुली करून पर्यटन वाढीस लागणार नाही तर त्यासाठी व्यावसायिकांना योग्य नियोजन करावे लागणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनाची दिशा बदलावी लागणार आहे. पर्यटकांना त्यांच्या सुरक्षेची, आरोग्यविषयक काळजीची हमी द्यावी लागणार आहे. शेजारील गोवा राज्य सुद्धा स्पर्धेत असणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांना काळजीपूर्वक धंद्यात पाऊल पुढे घालावे लागणार आहे.
शेजारच्या गोवा राज्यात देशविदेशातील पर्यटकांची गर्दी असते, कोरोनाचा धोका अशा ठिकाणी जास्त असतो. कोरोनावर उपाय येणे एवढ्यात तरी कठीण वाटत आहे आणि सद्ध्याच्या परिस्थिती मध्ये लोकांच्या खिशाला कात्री लागलेली असताना देशविदेशात पर्यटनासाठी जाणारे हौशी पर्यटक कोकणाकडे वळण्याची शक्यता आहे. परंतु आताच्या परिस्थितीत महागडे पर्यटन परवडणारे नसल्याने पर्यटन व्यावसायिकांनी येणाऱ्या संधीचे सोने करून भविष्याच्या दृष्टीने पाया मजबूत करण्यासाठी आपल्या उत्पन्नावर मर्यादा आणत काही प्रमाणात कमी खर्चात उत्तम पर्याय निवडून पर्यटन उभे केले पाहिजेत. वेळप्रसंगी पर्यटकांना आपल्या खाजगी वाहनांनी त्यांच्या घरापासून, गावातून आणून सेवा दिली पाहिजे, कारण सार्वजनिक प्रवास व्यवस्था आज सुरक्षेची राहिलेली नाही. तरंच कोकणात कोलमडलेलं पर्यटन उभारी घेईल आणि कोकणच्या पर्यटनास सुगीचे दिवस यायला वेळ लागणार नाही.
कोकणात गेली अनेकवर्षं लोक धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने यायचे, परंतु जसजशी पिढी बदलत गेली तसतस सागरी पर्यटन वाढीस लागले. तंबू निवास, पर्यटक बोटी, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, वॉटर स्पोर्ट्स असे पर्यटन विस्तारत गेले. परंतु कोरोनाच्या संकटामुळे गर्दी होणाऱ्या सागर किनाऱ्यांकडे पर्यटक लवकर वळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची दिशा बदलून ऍग्रो टूरिझम, जंगल सफारी, फॉरेस्ट टूरिझम, ग्रामीण भागातील वास्तव्य, घरचे चुलीवरचे जेवणाचे वेगवेगळे प्रकार देत ग्राम टूरिझम आदी संकल्पनांकडे जास्त लक्ष केंद्रित करावा लागणार आहे. सिंधुदुर्गात पर्यटन व्यावसायिक कुठल्या संधी निर्माण करतात आणि कसल्या संकल्पना पर्यटकांच्या पसंतीस उतरतात, व कोण व्यावसायिक योग्य नियोजन करून पर्यटकांच्या परीक्षेत उत्तीर्ण होतो यावरच कोकणच्या पर्यटन व्यवसायाचे अच्छेदिन अवलंबून आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा