You are currently viewing पाप – पुण्य समज, गैरसमज

पाप – पुण्य समज, गैरसमज

निसर्ग नियमानुसार खर पुण्य म्हणजे काय ते कसं मिळवायचं तसेच खर पाप म्हणजे काय ते टाळायचं कसं या संदर्भात *सद्गुरू श्री वामनराव पै* यांनी *पाप – पुण्य समज, गैरसमज* या ग्रंथात अचूक मार्गदर्शन केलेला आहे.

*प्रश्न १७ :- मानवी जीवनात क्रियमाण आणि नियतीचा माणसाच्या पाप-पुण्याशी व त्याच्या सुख – दुःखाशी कशा पध्दतीने संबंध येतो ?*

*उत्तर :-* *सर्वसाधारणपणे नव्व्याण्णव टक्के लोकांचा असा गैरसमज आहे की , ‘ नियती ‘ म्हणजे एक अज्ञात शक्ती असून ती आकाशाच्या पलीकडे दूर राहून जगातील लोकांचे सूत्रचालन करीत असते .*

*त्याचप्रमाणे लोकांचा असा गैरसमज आहे की , ‘ भाग्यविधाता ‘ असा कोणीतरी वर आकाशाच्या पलीकडे असून तो या जगातील माणसांची भाग्यरेषा रेखीत असतो .*

हे दोन्ही गैरसमज अत्यंत अनिष्ट स्वरुपाचे असून माणसांना दैववादी बनविणारे आहेत . जीवनविद्येला हा सर्व प्रकार मान्य नाही . जीवनविद्येने नियतीची व्याख्याच खालीलप्रमाणे केली आहे .

*” माणसांकडून विचार – उच्चार – आचार यांच्याद्वारे घडणारी कर्मे निसर्गाच्या नियमांना गती देतात व त्या गतीतून जी निर्मिती होते त्या निर्मितीला ‘ नियती ‘ असे म्हणतात .”*

याचाच अर्थ असा की प्रत्येक माणूस स्वतःची नियती स्वतःच त्याच्या कर्मांतून निर्माण करीत असतो . नियतीला जन्म देण्याचे कार्य क्रियमाण करीत असते .

माणसे जे क्रियमाण करीत असतात त्या क्रियमाणातून इष्टानिष्ट नियती निर्माण होते . स्वतः माणूसच स्वतःची नियती कशी निर्माण करतो ते आपण थोडक्यात पाहू .

सामान्यपणे सामान्य लोक इष्ट प्रारब्ध भोगित असतांना अहंकाराधीन होतात , त्यांचे चिंतन बिघडते व प्राप्त झालेल्या अनुकूल परिस्थितीमुळे ते उर्मट , उध्दट व कमालीचे उन्मत्त बनतात .

अशी माणसे घरातील माणसांना , शेजाऱ्या – पाजाऱ्यांना किंवा व्यवसाय बंधुना व हाताखाली काम करणाऱ्या माणसांना अत्यंत तुच्छतेची व अपमानास्पद वागणूक देऊन अनेक लोकांची मने दुखवितात .

अशा रीतीने ती उध्दट माणसे इष्ट प्रारब्ध भोगीत असतानासुध्दा पाप निर्माण करतात व ते पाप परिपक्व झाले की त्यातूनच त्यांंची अनिष्ट नियती निर्माण होते .

याच्या उलट जी माणसे इष्ट प्रारब्ध भोगीत असताना त्यांना जी अनुकूल परिस्थिती प्राप्त झालेली असते त्या परिस्थितीत घरातील व घराबाहेरील सर्व लोकांशी अत्यंत नम्रपणे , समंजसपणे व सौजन्याने वागून परस्परांना सुसह्य , सुखदायक व सहाय्यकारक अशी वातावरण निर्मिती करतात , ती माणसे इष्ट प्रारब्ध भोगीत असताना पुण्य निर्माण करतात व ते पुण्य परिपक्व झाले की त्यातून त्यांंची इष्ट नियती निर्माण होते .

*(…क्रमशः …)*

*– सदगुरु श्री वामनराव पै .*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =