You are currently viewing संदर्भ ग्रंथ:जीवनविद्या दर्शन

संदर्भ ग्रंथ:जीवनविद्या दर्शन

✒️ *प्रकरण:साक्षात्कार.*

 

मानवी जीवनात ‘साक्षात्कार’ या विषयाला फार महत्त्वाचे स्थान आहे. परंतु लोकांना या सत्याची जाणीव झालेली दिसत नाही. *माणसाला जो जन्म प्राप्त झालेला आहे तो देवाचा म्हणजे दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेण्यासाठीच होय.* मानवी जीवनाची वाटचाल स्वभावत: साक्षात्काराच्याच दिशेने (Divine Consciousness) होत असते. अशी गैरसमजूत बऱ्याच विद्वान लोकांची झालेली दिसून येते. वास्तविक वस्तुस्थिती नेमकी त्याच्या उलट आहे. *अज्ञान आणि अहंकार यांच्या आहारी जाऊन मानवी जीवन सुखदुःखाच्या चक्रव्यूहात सापडलेले असते.या चक्रव्यूहाचे भेदन करून साक्षात्काराचे अंतिम ध्येय माणसाला सहजासहजी गाठता येणे शक्य नसते. जर हे ध्येय साधावयाचे असेल तर त्यासाठी एका बाजूने प्रयत्न,दुसऱ्या बाजूने प्रार्थना व तिसऱ्या बाजूने ‘शाब्दे परेचि निष्णात’ अशा सद्गुरुंचे अचूक मार्गदर्शन आवश्यक असते.*

🎯 *अंत:करणात स्वस्वरूपाची जागृती होऊन आत्मानुभव प्राप्त होणे यालाच देवाचा साक्षात्कार असे म्हणतात.या व्यतिरिक्त सामान्य लोक ज्याला देवाचा साक्षात्कार असे म्हणतात तो कमी-अधिक भ्रमाचाच प्रकार असतो.*

🎯 *ज्या डॉक्टर किंवा वैद्यांना रोगावर योग्य औषध देता येत नाही तेच पथ्यावर अधिक भर देतात. त्याप्रमाणे ज्यांना आत्मसाक्षात्काराचा अचूक मार्ग अवगत नसतो तेच आहार-विहाराच्या बंधनांना फाजील महत्त्व देतात.*

🎯 *सत् व चित् हे ईश्वराचे दोन चरण ज्यांना धरता येतात त्यांना देवाचा साक्षात्कार तात्काळ.*

🎯 *होता अहंकार निराकार,तात्काळ घडे साक्षात्कार.*

🎯 *स्वरूप साक्षात्काराचे साध्य जो साधतो तो साधू.*

🎯 *ग्रंथ वाचून भगवंताचा साक्षात्कार होईल असे ज्यांना वाटते त्यांच्या अज्ञानाची कीव करावी तितकी थोडीच.*

🎯 *नामस्मरणाच्या सरणावर ‘मी’ सरला की साधकाला स्वस्वरूपाचा साक्षात्कार होतो.*

🎯 *अनुभविता असा ‘जो’ त्याला अनुभवित रहाण्याने अमृतानुभव प्राप्त होतो.*

🎯 *नाक धरले की हवेचा साक्षात्कार होतो त्याप्रमाणे मन धरले की देवाचा साक्षात्कार तात्काळ.*

🎯 *सद्गुण व सदाचार हे तत्त्वत: कितीही श्रेष्ठ असले तरी ते साधनेच्या कक्षेत येऊ शकत नाहीत; किंबहुना स्वरूप साक्षात्काराचे ते परिणाम होत.*

🎯 *जाणीवेला जाणीवेच्या ठिकाणी दिव्य स्वरूपाची अनुभूती येणे यालाच ईश्वर साक्षात्कार असे म्हणतात.*

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा