You are currently viewing सावंतवाडीत लॉकडाऊन न करण्याचा निर्णय….

सावंतवाडीत लॉकडाऊन न करण्याचा निर्णय….

लॉकडाऊन हा पर्याय नाही :- जगदीश मांजरेकर….

सावंतवाडी शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता नगरपालिकेत नगरसेवकांच्या बैठकीत सावंतवाडीत लॉकडाऊन करण्यासंदर्भात एकमत झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु नगरपालिकेला लॉकडाऊन करण्याचा अधिकार नसल्याने व्यापाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले होते, तसेच आज संध्याकाळी व्यापाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती.
आज झालेल्या बैठकीच्या सुरुवातीस नगराध्यक्षांनी आजची बैठक लॉकडाऊन करण्यासाठी बोलविली नसून चर्चा करून निर्णय घेण्यासाठी बोलविली असल्याचे स्पष्ट केले त्यामुळे लॉकडाऊन हा विषय महत्वाचा राहिलाच नव्हता. सावंतवाडी तालुका व्यापारी संघ अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी न.पा. च्या अखत्यारीत असलेल्या व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांचे सहा महिन्याचे भाडे व मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली. तसेच व्यापारी संघ व नगरपालिका यांच्यात कोणतेही वाद नसून संघटना म्हणून व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर वाद होतात पण भांडण नाही. व्यापाऱ्यांचे दुकान भाडे, लाईट बिल, बँकेच्या कर्जाचे हफ्ते, देणी, नोकरपगार यामुळे व्यापारी मेटाकुटीस आले असून आज बंद करण्याची व्यापाऱ्यांची मानसिकता नाही. सावंतवाडी व्यापारी संघाने राज्य सरकारने बंद करण्यापूर्वी २१ मार्चला स्वतःहून बाजारपेठ बंद केली होती. जे व्यापारी व नागरिक नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा, लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे सांगितले.
सतीश पाटणकर यांनी कामगारांच्या पोटापाण्याचा विचार करावा, न.पा.ला कर कमी करण्याचा अधिकार नसून ठराव घेऊन वर पाठवावा असे नमूद केले. हर्षवर्धन धारणकर यांनी मत मांडताना असलेल्या पैशात नोकरवर्ग सहा महिने पोसला, आता पोसण्याची परिस्थिती नाही, आताच कामधंदा सुरू झाल्याने बंद करण्यास विरोध दर्शविला. नाभिक संघटनेने सुद्धा शहर बंद करून उपयोग नसून करायचेच असेल तर सर्वच बंद करा, संघटना म्हणून आम्ही सहकार्य करू असे मत व्यक्त केलं. पत्रकार संतोष सावंत व लोंढे यांनी तलावावर बसणारा तरुण वर्ग तसेच ज्या घरातील पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्या घरातील व्यक्ती बाजारपेठेत फिरतात त्यावर प्रशासनाने निर्बंध कडक करावेत अशी सूचना केली. मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रासम यांनी ८ दिवस बंद करून साखळी तुटत नसून २८ दिवस बंद करावे लागेल व एक शहर बंद करून फायदा नसल्याचे नमूद करत, मेडिकल दुकानदारांनी कोरोनाच्या काळात सर्वात जास्त काम करून सहकार्य केले, तसेच लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे सांगितले.
नगरसेविका आनारोजिन लोबो यांनी बंद करण्यासंदर्भात आपण निवेदन दिले नसल्याचे सांगून करमाफी बाबत ठराव घेऊन उच्च पातळीवर पाठविण्याबाबत आश्वासन दिले. सद्ध्याच्या परिस्थितीत कर माफी नगरपालिकेस परवडणारी नसून संजू परब नगरपालिकेचा गाडा कसा हाकतात ते त्यांनाच माहिती असल्याचे सांगितले. बंदसाठी काल ठराव मांडणारे परिमल नाईक यांनी ही बंद साठी मीटिंग नसून सध्याची परिस्थिती बघून आपणच विचार करा असे मत व्यक्त केलं.
नगराध्यक्ष संजू परब यांनी आभार व्यक्त करून उद्यापासून कोणीही मोठी व्यक्ती, व्यापारी असला तरी मास्क न वापरल्यास, सोशल डिस्टनसिंगचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 19 =