आंबोली
तिलारी ते आंबोली या परिसरात मोठ्या प्रमाणात वटवाघळे आहेत. त्यांचे संवर्धन योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. असे आवाहन वट वाघळावरचे संशोधक राहुल प्रभुखानोलकर यांनी येथे केले. वटवाघुळ हा पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे. असे असताना सुद्धा त्याच्याबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. कोरोना काळात वटवाघूळाची बदनाम झाली. परंतु अभ्यासाअंती ते सगळे गैरसमज असल्याचे निष्पन्न झाले, असे त्यांनी सांगितले.
श्री. प्रभूखानोलकर यांनी नुकतेच आंबोली येथे वटवाघळांचे संवर्धन आणि संशोधन याबाबतची कार्यशाळा स्थानिक व निसर्गात संवर्धनासाठी काम करत असलेल्या लोकांसाठी आयोजित केली होती. या कार्यशाळेत त्यांनी वटवाघळांचे निसर्गचक्रातील महत्व व वटवाघळं विषयीची शास्त्रोक्त माहिती ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून व फोटोच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडली. श्री. खानोलकर हे गेली अनेक वर्ष महाराष्ट्र तसेच देशभरातील विविध भागांमध्ये वटवाघळं वरती अभ्यास करत असून त्या बाबतची इत्थंभूत माहिती त्यांनी गोळा केली आहे. वटवाघळं विषयीचे समज-गैरसमज व फायदे तोटे या बाबत सुद्धा त्यांनी यावेळी माहिती मांडली. शेतकऱ्यांच्या भात शेती वरील ऊस शेती वरील किंवा फळबागायती वरील कीटकांचा शत्रू हा प्रमुख्याने वटवाघुळ असतो. वटवाघुळ हे शेतकऱ्यांचे एक प्रकारे मित्र असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तिलारी ते आंबोली व संपूर्ण सिंधुदुर्गमध्ये वटवाघळांचा अधिवास वटवाघळांच्या प्रजाती याबाबत सुद्धा त्यांनी माहिती दिली. त्यामुळे सद्यस्थितीत वट वाघाचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी कोल्हापूर येथील मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी, फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले, वनस्पती अभ्यासक ऋतुजा कोलते, विक्रम होशिंग सिंधुदुर्ग मानद वन्यजीव रक्षक काका भिसे, डॉ. गणेश मर्गज तसेच विद्यार्थी उपस्थित होते.