You are currently viewing समाज बदलाचे सशक्त माध्यम : पत्रकारिता

समाज बदलाचे सशक्त माध्यम : पत्रकारिता

 

प्रिंट मिडिया ते इलेक्ट्रॉनिक्स मिडिया हा प्रसारमाध्यमांचा
प्रवास अनेक स्थित्यंतराचा साक्षीदार मानला जातो.त्यामुळेच ते समाज बदलाचे सशक्त माध्यमही समजले जाते.
यामध्ये मराठी वर्तमानपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर ,लोकमान्य टिळक ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,
क्रुष्णाजी खाडिलकर ,आचार्य प्र.के.अत्रे ,
नानासाहेब परुळेकर ,ग.गो.जाधव अशा अनेक समाजधुरिणांनी आपल्या निर्भिड लेखणीच्या माध्यमातून समाजातील अन्याय ,अत्याचार विरोधात आवाज उठवला.ते एवढ्यावरच न थांबता कुणाच्याही प्रशासकीय व राजकीय दबावाला बळी न पडता सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली. परिणामी ,प्रस्थापित व्यवस्थेच्या अन्याय ,अत्याचाराविरोधात जनतेमध्ये जागृती होवून त्यांनी संघटीत होवून न्याय मिळण्यास मोठी मदत झाली. त्यामुळेच वर्तमानपत्रांची ताकद किती मोठी आणि परिवर्तन घडवणारी असते ,हे देखील अधोरेखित झाले. त्यामुळे साहजिकच वर्तमानपत्र आणि त्या अनुषंगाने समाजातील चुकीच्या रुढी – परंपरा ,अंधश्रद्धा ,भ्रष्टाचार अशा चुकीच्या गोष्टींना वेळीच आळा घालण्यासाठी प्रबोधनाचे विश्वासार्ह
सशक्त माध्यम म्हणून याकडे पाहिले जावू लागले.तसतसे या क्षेत्रात देखील आधुनिकतेने कात टाकून इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमापर्यंत जागा घेतली.त्यामुळे साहजिकच या क्षेत्रात देखील नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या.असे असले तरी या क्षेत्रातही
काही प्रमाणात व्यावसायिकता आली ,ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. यामध्ये पूर्वीइतकी
वर्तमानपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स प्रसार माध्यमांची
सामाजिक कर्तव्याची भावना कितपत ,हा थोडा वादाचा मुद्दा ठरु शकतो.पण ,याला काही अपवादही आहेत. ज्यांनी अजूनही समाज परिवर्तनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते पत्रकारांच्या लेखणीच्या सोबतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.यामध्ये पत्रकार ,उपसंपादक यांचा स्वयंस्फूर्तीचा सहभाग हा पत्रकारिता परमो: धर्म या पवित्र भावनेला नव्यानं उजाळा देणारा ठरतो.पत्रकारिता क्षेत्रात निव्वळ बातम्यांना स्थान असते ,असेही नाही. कारण ,बातम्यांच्या पलिकडे जावून विश्लेषण ,लेख ,दैनंदिनी ,
अग्रलेख ,वाचकांचा पत्रव्यवहार याचेही महत्त्व समाज जागृतीबरोबरच परिवर्तन आणि शाश्वत विकासासाठी मोलाची भूमिका पार पाडणारी असते.
काळाची गरज म्हणून वर्तमानपत्रांबरोबरच इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी देखील वाचकांच्या आवडीनिवडीचा विचार करत त्यामध्ये नाविन्यता व दर्जेदारपणा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु ठेवला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा ही ब-याचदा पत्रकारांसोबतच जाहिरात ,वितरण व अन्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरणारी असते.ब-याचदा पत्रकारांना मोठी जोखीम पत्करुन पत्रकारिता करावी लागते. अशा वेळी संबंधित पत्रकाराच्या पाठिशी व्यवस्थापनाने खंबीरपणे उभे राहणे देखील तितकेच गरजेचे आहे. याच कारणातून आजघडीला अनेक पत्रकार संघटीत होवून ते विविध संघटनेच्या माध्यमातून आपल्या न्याय – हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्या संरक्षणाचा कायदा झाला असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही ,हेच मोठे दुर्देव मानले जात आहे. यामध्ये सत्तेतील कारभा-यांच्या इच्छाशक्तीचा अभाव दिसत आहे. त्यामुळे जे जनतेच्या मुलभूत हक्काच्या संरक्षणासाठी निर्भिड लेखणीच्या माध्यमातून लढतात ,त्यांनाच आता स्वतःच्या संरक्षणासाठी लढावे ,झगडावे लागत आहे. अशाही बेभरवशाच्या वातावरणात पत्रकार हे जनतेला न्याय देण्यासाठी
आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठिशी जनतेने खंबीरपणे उभे राहण्याची गरज निर्माण झाली आहे.कारण ,पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो.तो डळमळीत होवू नये ,यासाठी जनतेच्या सामूहिक पाठबळाची नितांत गरज यासाठीच आता प्रबोधन होणे देखील तितकेच महत्वाचे ठरु लागले आहे.समाजाच्या भल्यासाठी त्याग ,समर्पण व लढावू व्रुत्ती अंगी असलेल्या अनेक पत्रकारांनी जनतेला न्याय मिळवून देत व्रतस्थ समाजकार्याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाने अनेक नवे पत्रकार या क्षेत्रात येवून विविध अवांतर वाचन ,कष्टाळूव्रुत्ती ,सामाजिक भान आणि वास्तवदर्शी लिखाण करत समाजाचा जागल्या ही भूमिका अगदी प्रामाणिकपणे पार पडत आहेत.त्यामुळे त्यांना समाजाचे पाठबळ मिळून समाज परिवर्तनाबरोबरच निकोप समाज निर्मितीच्या कार्याला गती मिळण्याची आशा मनात पल्लवीत झाली आहे. या सा-या धडपडीतून उधळू फुले प्रकाशाची ,अंधाराच्या वाटेवरी हा विचार प्रत्यक्षात साकारणारा आहे.म्हणून ,पत्रकारांसाठी
पत्रकारिता हे व्रत असले तरी ते समाजाच्या पाठबळाशिवाय पूर्ण होवू शकत नाही ,याची जाणीव जागरुक नागरिक म्हणून प्रत्येकाने जपायलाच हवी.कारण ,संघटीत लढ्याशिवाय समाजात परिवर्तन ,क्रांती घडत नाही ,हाच आजपर्यंतचा इतिहास आहे.

– सागर बाणदार
मो.८८५५९१५४४०

प्रतिक्रिया व्यक्त करा