वैभववाडी
तालुक्यातील प्रगतशील शेतकरी महेश संसारे यांनी कोकण विभागात खरीप हंगाम भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. महाराष्ट्र शासन विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग यांच्या कडून भातपीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री. महेश संसारे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. महेश संसारे हे तालुक्यातील मांगवली गावचे सुपुत्र आहेत. तालुका खरेदी विक्री संघामध्ये ते चेअरमन पदावर कार्यरत आहेत. तसेच प्रवण फार्मर प्रोड्युसर कंपनीचे ते चेअरमन आहेत. जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा देशी गोपालक उत्पादक संघाच्या चेअरमन पदावर कार्यरत आहेत. मांगवली येथे सुवर्ण सिंधू गीर गोशाळा व पंचगव्य चिकित्सा केंद्र च्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे.
भात पिकासाठी त्यांनी प्रो. ऍग्रो कंपनीचे 6444 चे एक काडी बियाणे वापरले होते. त्यांनी संपूर्ण शेती चारसूत्री पद्धतीने लागवड केली होती. गिरीपुष्प पाला, गवताची मशागत, जीवामृताच्या फवारण्या शेतात त्यांनी केल्या. नियोजनबध्द पद्धतीने त्यांनी भाताचे उत्पादन घेत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यांना कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, मंडळ कृषी अधिकारी माणिकराव शिंदे, कृषी सहाय्यक स्नेहा घोडाम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मागील वर्षी त्यांना नाशिक येथे कृषीथाँन आदर्श पशुपालक पुरस्कार मिळाला होता. तसेच सन 2020 – 21 मध्ये तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेत त्यांना तिसरा क्रमांक मिळाला होता.
प्रगतशील शेतकरी महेश संसारे यांना मिळालेले विविध पुरस्कार