You are currently viewing सरत्याला निरोप… नव्याचं स्वागत…!
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

सरत्याला निरोप… नव्याचं स्वागत…!

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य वृत्तवाहिनी प्रतिनिधी, वार्ताहर, पत्रकार, उपसंपादक, लेखक,कवी सागर बाणदार यांचा अप्रतिम लेख

‘कल किसने देखा है, आ इस पल को जी ले जरा‘ असे म्हणत प्रत्येक क्षण समरसून जगण्याचा प्रयत्न हा खरा जीवनाचा मतितार्थ समजला जातो. सुख-दु:खाच्या आठवणी मनात जागवतानाच भविष्यातील स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नवे संकल्प करून सरत्या वर्षाला निरोप देत आता नव्या वर्षाचे उत्साहाने स्वागत करायला सर्वजण सज्ज झालो आहोत. ‘ह्दयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग‘ अशी तरल भावना मनात साठवत जगणे अधिक समृध्द होण्याच्या दृष्टीने होणारी प्रत्येक धडपड आत्मिक सुख-समाधान देणारी ठरु शकते.
१ जानेवारी ते …. ३१ डिसेंबरची मध्यरात्र इथंपर्यंतचा प्रवास म्हणजे एक वर्षाचा टप्पा. या एक वर्षामध्ये अनेक उन-पावसाचे खेळ प्रत्येकाच्या जीवनात येतात. कधी सुखासाठी होणारी धडपड तर कधी दु:ख पचविण्याचं धैर्य याही पलिकडे अनेक गोष्टींचा समरसपणा या वर्षामध्ये सामावलेला असतो. जुनी पिढी आणि नवी आधुनिक पिढी यामध्ये मोठी दरी निर्माण झाल्याने या सरत्या वर्षाकडे आणि उगवत्या दिवसाकडे पाहण्याचे संदर्भही दिवसेंदिवस बदलत चालले आहेत. ही दरी कमी होण्यासाठी कित्येकदा झालेले प्रयत्नही असफल ठरले आहेत. म्हणून काय थोडंच थांबायचं असतं? नाही तर प्रत्येक वाट काटेरी असली तरीही न थकता वाटचाल करायची असते. कारण प्रत्येक वर्ष तसं महत्वाचं असतं, तसंच प्रत्येक महिना, दिवस, मिनिटे अणि सेकंद तितकेच महत्वाचे असतात.
सरतं वर्ष भूतकाळाच्या छायेत दडपलं गेलं आणि उगवतं वर्ष हे तर भविष्यासाठी असलं तरी मागच्या चुकलेल्या गोष्टी विसरुन फक्त प्रेरणा देणार्‍याच आपल्याबरोबर ठेवून सुकर वाटचाल करायची असते. ३१ डिसेंबरचा दिवस जसा नववर्षाच्या चाहुलीमुळे उत्साह आणणारा तसाच सरतं वर्ष काही जुन्या सुख-दुखाच्या आठवणी मागे ठेवून जाणारा असल्याने जड अंत:करणाने मनात नसतानाही (आपल्या हातात नसताना) त्याला निरोप द्यावा लागतो. त्यासाठीची तयारी आमच्या तारुण्याने फुललेल्या नव्या पिढीने मोठ्या उत्साहाने केली आहे. अनेक बेतही रचले आहेत . कारण पैशाचं अवाढव्य वाढलेलं महत्व आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. पैशाने आमचा चंगळवाद वाढला आणि त्याचबरोबच दारु, बिअरसारख्या मद्यप्राशनाचे प्रमाण वाढल्याने आधुनिक पिढी केवळ पोकळच आधुनिक बनत चालली का ? किंवा आम्ही आधुनिक आहोत ? असा प्रश्‍न तरुण पिढीने कधी स्वत:ला विचारला आहे काय? कधी तसा प्रयत्न झाला असेल तर ही नव्या सुधारणांची सुरुवातच म्हणावी लागेल. कारण चंगळवाद, भोगवाद वृत्ती आपले जीवन बरबटून टाकत आहेत. आधुनिकतेच्या नावाखाली साजरे होणारे व्हँलेंटाईन डे, फे्न्डशिप डे, रोज डे आणि न्यू इअर सेलिब्रेशन आपल्याला अधोगतीकडे नेत आहे. केवळ दारुच्या नशेत मौजमजा करून सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि त्याच नशेच्या धुदीमध्ये नव्या वर्षाचे स्वागत करायचे. या दोन्ही क्रिया मद्याच्या धुंदीमध्ये होणार असतील तर नव्या वर्षाबाबत आशा तरी कशाला बाळगायच्या ?
काहींनी नव्या वर्षाच्या चाहुलीत ३१ डिसेंबरचा दिवस चंगळवाद, भोगवादाने साजरा करण्याचा बेत आखला आहे . हे कितपत योग्य आहे, याचाही विचार व्हायला हवा. नवे संकल्प, नवे ध्येय, नव्या आशा मनामध्ये रुजवनू त्या प्रत्यक्ष जीवनात उतरविण्याचा प्रयत्न आपल्या कुटुंबासह, मित्र-मैंत्रिणींसोबत करायला हवा. आपल्या जीवनात पैशाला असाधारण महत्व असेलही पण त्याचबरोबर शाश्‍वत माणूसकी जपण्याचा प्रयत्न आपला असेल यासाठी प्रत्येकानेच एक पाऊल टाकण्याची खरी गरज आहे. सरत्या वर्षातील भ्रष्टाचार, खून, बलात्कार, चोरी, मारामारी याचबरोबरच किरकोळ, कारणावरून तुटलेली नाती या घटना प्रत्येकालाच आत्मपरिक्षण करायला लावणार्‍या आहेत. त्या पुन्हा घडू नयेत तसेच आपल्या मित्रांबरोबरच शत्रूचेही भले व्हावे, अशी मनोधारणा असणारी समाज व्यवस्था निर्माण करण्याचे प्रत्येकाचेच या नव्या वर्षातील राष्ट्रीय कर्तव्य असायला हवे. शेवटी इतकंच की, जुन्या वर्षातील अनेक घटना या बेरीज, वजाबाक्या आहेत. त्या पुन्हा नव्या वर्षाच्या शेवटी आपल्याला कराव्या लागणार आहेत. कारण यातूनच समृध्द जगण्याचे परिमाण हाती गवसत राहून जगण्याचा खरा अर्थ उमगतो. जुन्या पिढीने नव्या पिढीला समजावून घेत त्यांच्या चांगल्या कार्याला पाठबळ देण्याची भूमिका घेतल्यास अनेक गुंता-गुंतीचे प्रश्‍न सहजच सुटतील अन् नव्या पिढीमध्ये विधायक कार्यासाठी प्रेरणा मिळत राहिल. यासाठी ‘या ह्दयीचे, त्या ह्दयी‘ हा सुसंवाद सहज घडवण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी सर्वांनी कर्तव्याच्या भावनेने पार पाडायला हवी. मनाला वेदना, दु:ख देणार्‍या आठवणींना मनातून ह्द्दपार करतानाच आपल्याला आत्मविश्‍वास देणार्‍या गोष्टीच सदैव सोबत ठेवून नवे ध्येय, नवे स्वप्न उराशी बाळगत नव्या आव्हानांना अविरत कष्टाने, जिद्दीने तोंड देण्याची धमक ठेवणे, हेच केवळ आपल्याला नव्या समृध्द जीवनाच्या मुक्कामापर्यंत पोहचवू शकते. नववर्षाचा हा संकल्प करतानाच आपल्या परीने इतरांच्या चेहर्‍यावर आनंद आणण्याचा प्रयत्न झाल्यास जीवन खर्‍या अर्थाने समृध्द होत असल्याची जाणीव मनाला सुखद अनुभव देणारी ठरेल. मग् चालूया ना या संकल्पाच्या पायवाटेवरुन अडथळ्यांची शर्यत पार करत शाश्वत यशाचा आनंद निरंतर चाखण्यासाठी…!

– सागर बाणदार
मो.८८५५९१५४४०

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =