You are currently viewing का हवीय राजकारण्यांना शेतकऱ्यांची बँक?

का हवीय राजकारण्यांना शेतकऱ्यांची बँक?

विशेष संपादकीय…..

सिंधुदुर्ग जिल्हा बँक….जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, लघु उद्योजकांची बँक म्हणून ओळख असणारी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे सहकार या शब्दाचा खून करून राजकीय आखाडाच बनली आहे. राजकीय लोकांच्या असुरी इच्छा आणि अपेक्षांमुळे जिल्हा बँकेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली. एकेकाळी सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव यांनी जिल्ह्यात सहकार रुजवून एकहाती जिल्हा बँक सांभाळली होती. खेळीमेळीच्या वातावरणात मैत्रीपूर्ण लढती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत होत होत्या. परंतु गेल्या काही वर्षात जिल्हा बँक ताब्यात आली तर राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल, बँकेकडून राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणावर कर्ज घेता येतील आणि थकीत कर्ज ठकवता येतील अशा दुहेरी हेतूने काही राजकीय पक्ष जिल्हा बँकेत प्रवेशकर्ते झाले आणि तेव्हापासून बँकेची अनेक कर्जप्रकरणे थकीत होऊ लागली. अशाचप्रकारे बँक ताब्यात आल्यावर राजकीय दृष्ट्या त्याचा मोठा फायदा होईल म्हणून जिल्ह्या बँकेमध्ये कमालीचा राजकीय हस्तक्षेप वाढला आहे.
राजकीय नेत्यांना का हवीय जिल्हा बँक?
जिल्हा बँक ही सहकारी तत्वावर चालणारी स्वायत्त संस्था. सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव यांनी अनेक वर्षांच्या तपस्येने अत्यंत हुशारीने शेतकऱ्यांचे हित जपत जिल्हा बँकेच्या सोन्याचे दिवस आणून दिले. शिवरामभाऊ यांच्या नंतर सहकाराची खोलवर जाण असलेले सतीश सावंत यांनी देखील बँकेचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळला. सतीश सावंत यांनी अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आणून बँकेला राज्यात एक ओळख निर्माण करून दिली. परंतु जिल्हा बँकेकडून काही राजकीय लोकांनी गाड्यांसाठी घेतलेली कर्जे परतफेड न करता थकीत ठेवली, त्यामुळे अशाप्रकारे बँकेला बुडविणाऱ्या काही राजकीय लोकांना बँक म्हणजे राजकीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कुरण असंच वाटू लागलं आहे. जिल्हा बँकेचे सद्यस्थितीत असलेली मजबूत बांधणी आणि बँकेतील ठेवी यावर डोळा ठेऊन काही राजकीय लोक बँकेचा ताबा आपल्याकडे घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या हितापेक्षा राजकारण्यांचे हित जपण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पैकी बँकेकडे कोट्यावधी रुपयांचे थकीत कर्ज देखील राजकीय लोकांचेच आहे याची मात्र सर्वांनीच दखल घेणे आवश्यक असून अशाप्रकारे बँकेला बुडविणारे राजकीय लोक बँकेवर सत्तेत आले तर भविष्यात जिल्हा बँकेची भुदरगड होण्यास नक्कीच वेळ लागणार नाही.
राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या नावावर बोलेरो सारख्या महागड्या गाड्या घेण्यात आल्या. या गाड्यांसाठी कर्ज उचल जिल्हा बँकेकडून करण्यात आली. परंतु त्या राजकीय पक्षासाठी घेतलेल्या गाड्यांची कर्जे थकीत असून बँकेला मोठ्या प्रमाणावर त्याचे नुकसान सोसावे लागले आहे. शिवरामभाऊ जाधव हे राजकारणात नव्हते, तर सहकार रुजविण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली होती. त्यांच्या अपार कष्टांतून ही जिल्हा बँक उभी राहिली म्हणून आज राजकारणी लोक ती ओरबाडून खाण्यासाठी भांडत आहेत. याच राजकीय आखाड्यात आज जिल्हा बँकेची निवडणूक अत्यंत तणावाच्या वातावरणात होत असल्याची आपण पाहत आहोत.
का वाढला जिल्हा बँक निवडणुकीत तणाव
काहीच दिवसांपूर्वी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, ज्यात आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांसहीत माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत व खुद्द नितेश राणे यांचे नाव घेतले गेले, तिथूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात तणावाला सुरुवात झाली. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता असल्याने त्यांनी व गोट्या सावंत, मनीष दळवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. केवळ बँकेच्या माध्यमातून आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी चाललेली धडपड पाहता जिल्हा बँक राजकीय आखाडा बनली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले पंधरा दिवस जिल्ह्यातील वातावरण तंग बनले, कमालीचा तणाव जिल्हावासीयांनी अनुभवला. कणकवलीत आज सतीश सावंत यांच्या मतदान केंद्रावर खुद्द जिल्हापरिषद अध्यक्षा असलेल्या संजना सावंत आणि सतीश सावंत यांच्यात झालेली हमरातुमरी राजकारणाने कोणता स्तर गाठला हे दाखवून देतोच, परंतु जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका व्यक्तीच्या तोंडात जिल्ह्याचेच प्रतिनिधित्व केलेल्या व्यक्तिविरुद्ध सर्वांसमोर आलेला अर्वाच्च शब्द हे कशाचे धोतक आहे? अशाप्रकारचे लोकप्रतिनिधी असणे हीच जिल्हावासीयांसाठी शरमेची बाब आहे.
जिल्हा बँकेचे सदस्य म्हणजे बँकेचे ट्रस्टीच. त्यामुळे बँकेच्या यशासाठी किंवा अपयशासाठी देखील तेच जबाबदार असतात. जिल्ह्यातील शेतकरी, लघु उद्योजक, बचतगट आदींच्या कल्याणाचा वसा घेतलेल्या बँकेवर राजकीय सावट पडलं आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष पहायला मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय व्यक्तींचा वरदहस्त लाभलेल्या अनेक पतसंस्था बुडीत निघाल्या आहेत. भाईसाहेब सावंत पतसंस्था, सातेरी नागरी अशा संस्था नामशेष झालेल्या जिल्ह्याने पाहिल्या आहेत. आज सिंधुदुर्गात सैनिक पतसंस्था, भंडारी पतसंस्था अशा नेमक्याच संस्था अस्तित्व टिकवून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असणाऱ्या आणि शिवरामभाऊनी महत्प्रयासाने उभी ठेवलेली ही सिंधुदुर्ग जिल्हा बँक राजकीय प्रभावाखाली राहिली, राजकीय वरदहस्त राहिला तर त्याची काय अवस्था होईल????
हाच मोठा प्रश्न उभा राहत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची असलेली बँक शेतकर्यांचीच रहावी अन्यथा येत्या काळात जिल्हा बँकेची अवस्था देखील भुदरगड सारखी होईल यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − six =