निलंबित कर्मचारी योगेश केंगार यांची जिल्हाधिका-यांकडे निवेदनाव्दारे मागणी
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील कचरा उठाव कामातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे. यामध्ये या कामाचा ठेका असलेल्या आराध्या एन्टरप्राईजेस व आदर्श फॅसिलिटी मॅनेजमेन्ट सर्व्हिसेस या दोन कंपन्याकडून संबंधित कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यापेक्षा निम्म्याहून कमी वेतन देवून त्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.त्यामुळे वेतन भ्रष्टाचार कारभाराची सखोल चौकशी करून यातील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ठेकेदार कंपनीने निलंबित केलेल्या योगेश केंगार यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजी नगरपालिकेने शहरातील वार्ड क्रमांक १ ते २६ मधील घरा- घरातून ओला व सुका कचरा गोळा करून तो कचरा डेपोवर टाकण्याच्या कामाचा ठेका आराध्या
एन्टरप्राईजेस या कंपनीस देण्यात आला होता. पण या कंपनीने निकिता एन्टरप्राईजेस या नावाने बोगस फर्म काढून त्याद्वारे किमान वेतन कायद्यानुसार वेतन निश्चित केलेले असताना देखील संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या बॅंक खात्यावर वेतनापोटी कमीत कमी ३० टक्के व जास्तीतजास्त ४५ टक्के रक्कम जमा करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय बळावला आहे. त्यातच मागील वर्षी कचरा उठाव कामाचा ठेका नव्याने ठेका मिळालेल्या आदर्श फॅसिलिटी मॅनेजमेन्ट सर्व्हिसेस या कंपनीने देखील २०० कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन न देता त्यामध्ये भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार कर्मचारी योगेश केंगार यांनी केली. त्यामुळे सदर ठेकेदार कंपनीने त्यांना कामावरून कमी केले आहे.
याबाबत न्याय मिळावा ,यासाठी योगेश केंगार यांनी सहायक आयुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. असे असूनही या कार्यालयाकडून संबंधित ठेकेदार कंपनीच्या विरोधात चौकशी करून पुढील कार्यवाहीबाबत चालढकलीचे धोरण अवलंबले जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सदर प्रकरण नजीकच्या जिल्ह्यातील सहायक कामगार कार्यालयाकडे चौकशीसाठी सोपवण्यात यावे ,अशी मागणी निलंबित कर्मचारी
श्री.केंगार यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली आहे.
एकंदरीत , वेतन भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार घडत असूनही याकडे नगरपालिका प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.. त्यामुळे कचरा उठाव करणाऱ्या संबंधित ठेकेदार कंपनीच्या भ्रष्ट कारभाराची व त्यांना पाठिशी घालणाऱ्या पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून यातील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी ,अशी मागणी निलंबित कर्मचारी योगेश केंगार यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे कचरा उठाव कर्मचाऱ्यांच्या वेतन भ्रष्टाचाराची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच या प्रकरणाची जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे गांभीर्याने दखल घेवून चौकशीअंती संबंधित दोषींवर काय कारवाई करणार , याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.