You are currently viewing धुंधुर मास
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

धुंधुर मास

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी दीपक पटेकर यांचा धनुर्मास म्हणजेच धुंधुरमास महत्व विशद करणारा लेख.

सूर्य एका वर्षात १२ राशींतून भ्रमण करत असतो, तो जेंव्हा धनु राशीत भ्रमण करतो तो काळ म्हणजे *धनुर्मास ऊर्फ ‘धुंधुरमास’* मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी म्हणजे या महिन्याचा शेवटचा दिवस. हा काळ शक्यतो १३-१७ डिसेंबर पासून १३-१५ जानेवारीच्या आसपास असतो.

धुंधुरमास हा शब्द अनेकांसाठी नवखा असू शकतो…परंतु जुन्या जाणत्या लोकांना मात्र तो नवीन नसतोच. धुंधुरमासाचा काळ म्हणजे हेमंत ऋतू…हवेत अत्यंत गारठा असतो आणि रात्रीच्या वेळी तर गारठा वाढतच जातो….मंद वाऱ्याची झुळूक..पहाटे धरणीवर जणू ढग उतरले तसे…धुक्याची शाल पांघरलेलं आल्हाददायक वातावरण.. हवेच्या माऱ्यामुळे फुटणारे ओठ…दातावर आपटणारे दात आणि आपली कोमल नाजूक असणारी त्वचा शुष्क, कोरडी होणे…. हवेतील गारठ्यामुळे मनुष्याचा जठराग्नी नाभीमध्ये अडकला जातो आणि माणसाची भूक वाढते. त्यामुळे मनुष्याला भल्या पहाटे, सकाळीच भूक लागते.

आयुर्वेदानुसार भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि भूक लागल्यावर खाण्यास उशिरही करू नये. कारण जठराग्नी शांत करायचा असेल तर त्याचे अन्न हे त्याला द्यावेच लागते. आणि भूक लागूनही न खाल्ल्यास उद्दीपित झालेला जठराग्नी रस, रक्त आदी धातूंचा नाश करतो, परिणामी थकवा येणे, वजन घटणे यासारखे दुष्परिणाम दिसू लागतात.

मकर संक्रमणाच्या आधी येणाऱ्या ऋतूमध्ये सामान्य लोकांचा जठराग्नी भल्या पहाटे उद्दीपित होतो असे आयुर्वेद मध्ये म्हटले जाते. त्यामुळे ह्या महिन्यात पहाटे उठून ह्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या *वांगी, ओला हरभरा, ओले तूर, ओला पावटा, मटार, गाजर* या सारख्या भाज्या, ज्वारी बाजरीसारखी धान्ये खाण्याचे महत्व खूप आहे.

धुंधुरमासात आपल्या खाण्यामध्ये तूप, लोणी, तीळ, शेंगदाणे याचाही वापर सढळ हस्ते व्हायला हवा. हे तेलकट खाणं इतर ऋतुंमध्ये पचायला जड असलं तरी ह्या ऋतूमध्ये मध्ये मात्र याचा त्रास होत नाही असे मानले जाते. त्यामुळे प्रकृती तर उत्तम राहतेच परंतु त्वचेची कांतीही उजळते. वातावरणातील बदलानुसार माणूस आपल्यात बदल घडवून आणतो म्हणून तर मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटून सण साजरा केला जातो. आपल्या प्रत्येक सणाचं एक महत्व आहे, त्या त्या ऋतूनुसार, राशीनुसार, जैव-विविधतेनुसार सण साजरे केले जातात. आपल्या सणांमधून आपल्याला त्या त्या दिवसांतील वैशिष्ट्य जाणता येतील, शिकता येतात. म्हणून तर भारतात सणांना अनन्यसाधारण महत्व आहे.

(दिपी)
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =