You are currently viewing एखाद्याच्या जीवापेक्षा कोणतीही निवडणुक महत्वाची नाही…! – आमदार वैभव नाईक

एखाद्याच्या जीवापेक्षा कोणतीही निवडणुक महत्वाची नाही…! – आमदार वैभव नाईक

सिंधुदुर्ग :

 

कणकवली शहरात संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याला आठवडा उलटत आला तरी अद्यापही पोलीसांनी या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचे नाव जाहीर केलेले नाही. जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर कुणा केंद्रीय मंत्र्यांच्या दबावापोटी पोलीस मुख्य सुत्रधाराचे नाव जाहीर करण्यास टाळाटाळ करत असतील तर शिवसेना कदापि शांत बसणार नाही. संतोष परब हल्लाप्रकरणी पोलीस प्रशासन जिल्ह्यातील जनतेला आजपर्यंत केलेल्या कारवाईबाबत आवश्यक ती माहिती देण्यास का टाळाटाळ करीत आहे…? सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला करणाऱ्या अपप्रवृत्ती कोण आहेत हे जिल्ह्यातील जनतेला समजलेच पाहिजे. पुढील दोन-तीन दिवसात संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या मुख्य सूत्रधाराचे नाव पोलीसांनी उघड केले नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल. पोलीसांनी कुणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये. एखाद्याच्या जीवापेक्षा जिल्हा बँक किंवा कोणतीही निवडणुक महत्वाची नाही. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीतील मतदानाचा विचार न करता पोलीसांनी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचे नाव आता जाहीर करायलाच हवे, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

संतोष परब हल्लाप्रकरणी घटनेदिवशीच पोलीसांनी चार हल्लेखोरांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी हल्ल्याची कबुली दिल्याचीही माहिती आहे. त्यानंतर आणखीन एका आरोपीला पोलीसांनी अटक केली. या सर्व आरोपींचे पुणे कनेक्शन उघड झाले आहे. जिल्ह्यातील कोणत्या नेत्याचे पुण्यात मॉल व बाकीचे व्यवसाय आहेत हे जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. आमदार नितेश राणे व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांना पोलीसांनी चौकशीची नोटीस पाठवली. आमदार नितेश राणेंनी वकीलांमार्फत पोलीसांना उत्तर पाठवल्याचे आणि पोलीस चौकशीला उपस्थित राहणार नसल्याचे मिडियासमोर जाहीर केले. तरी सुद्धा काल कणकवली पोलीस स्टेशनमध्ये आमदार नितेश राणे व गोट्या सावंत या दोघांचीही दोन-तीन तास कसुन चौकशी करण्यात आली. याचाच अर्थ पोलीसांनी संतोष परब हल्ला प्रकरणातील मुख्य सुत्रधार ओळखले आहेत. फक्त जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर हल्ल्याच्या मुख्य सूत्रधाराचे नाव उघड करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. प्रस्तुत प्रकरणी पोलीसांनी केवळ चौकशीचा फार्स न करता आमदार नितेश राणे व गोट्या सावंत या दोघांनाही तात्काळ अटक करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकाराला सहकारमहर्षी शिवरामभाऊ जाधव, डी. बी. ढोलम, केशवराव राणे आणि भाईसाहेब सावंत यांच्यासारख्या पुण्यात्म्यांची दैदीप्यमान नेत्यांची परंपरा आहे. आमदार नितेश राणे ही वैभवशाली परंपरा खंडित करून जिल्ह्यातील सहकार क्षेत्र रक्तरंजित करू पाहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्र नासवण्याचे त्यांचे नापाक मनसुबे कधीच सफल होणार नाहीत. काल नितेश राणेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून अवमान केल्याप्रकरणी मी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यापुर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान केल्यानंतर काय दुष्परिणाम होतात हे केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंनी अनुभवलेले आहे. त्यानंतरही नितेश राणेंना फारशी उपरती झालेली दिसत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून अवमान केल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल करून सिंधुदुर्ग पोलीसांनी पुढील कायदेशीर करावी आणि त्यांना चांगलीच अद्दल घडवावी. त्याशिवाय नितेश राणेंमध्ये सुधारणा होणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 10 =