You are currently viewing स्वप्न दर्शन

स्वप्न दर्शन

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलाकार श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

दर्शनास चरणांच्या होते मन हे आसुसलेले
कसे वदू मी भाग्य खरोखर स्वप्नी अवतरले ।।

ध्यानास्तव प्रभु गाणगापुरी
निवास गुरुंचा मेरु शिखरी
कुठे न जाता चरणांवर मी मस्तक ठेवियले
कसे वदू मी भाग्य खरोखर स्वप्नि अवतरले ।।

अनुष्ठान जरी कृष्णा तिरी
दक्षिण काशी भिक्षेच्या परि
दर्शनास हो कशी मजकडे वळली ती पाउले
कसे वदू मी भाग्य खरोखर स्वप्नी अवतरले ।।

काशी नगरी गंगा स्नाना
पंढरि नगरी गोपिचंदना
त्या गंधाचा सुवास अजुनी मम हृदयी उमले
कसे वदु मी भाग्य खरोखर स्वप्नी अवतरले ।।

गुरू भोजना पांचाळेश्वरि
निद्रा योगा असति माहुरी
कृपा कटाक्षे दत्त गुरुंच्या अमृत मी प्राशिले
कसे वदू मी भाग्य खरोखर स्वप्नी अवतरले ।।

स्वप्नि दिसते मज ऒदुंबर
ती नरसोबाची वाडी सुंदर
स्वप्न म्हणू तर तेज असे की नेत्रहि भारावले
कसे वदू मी भाग्य खरोखर स्वप्नी अवतरले ।।

जागृत होता चित्त निमाले
कारण होते मज आठवले
कमंडलूतिल तीर्थ मस्तकी तुम्हिच शिंपडले
कसे वदू मी भाग्य खरोखर स्वप्नी अवतरले ।।

*अरविंद*
६/१२/२०१९

प्रतिक्रिया व्यक्त करा