प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले यांनी विद्यार्थ्यांना केले मौलिक मार्गदर्शन
इचलकरंजी शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नामांकित असलेल्या डीकेटीई इन्स्टिट्यूटच्या प्रथम वर्ष टेक्स्टाईल व इंजिनिअरींग विद्यार्थ्यांचा स्वागत कार्यक्रम नुकताच घोरपडे नाट्यगृहात
मोठ्या उत्साहात पार पडला.
इचलकरंजी शहरातील डीकेटीई इन्स्टिट्यूटने दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा कायम राखत अनेक अभियांत्रिकी घडवले आहेत. या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी देश – विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये आपले कौशल्य वापरत यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत. त्यामुळे साहजिकच डीकेटीई इन्स्टिट्यूट आता देशभरातील नामांकित म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात कमालीची यशस्वी ठरली आहे.या इन्स्टिट्यूटच्या प्रथम वर्ष टेक्स्टाईल व इंजिनिअरींग विद्यार्थ्यांचा स्वागत कार्यक्रम घोरपडे नाट्यगृहात
मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी डीकेटीई इन्स्टिटयूटचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले यांनी बदलत्या शैक्षणिक प्रणालीमध्येदेखील आव्हान पेलणारा सक्षम अभियंता बनविण्यासाठी डीकेटीई इन्स्टिट्यूट नेहमी अग्रेसर राहिल असा विश्वास बोलून दाखवला.
तसेच इंडस्ट्रीजशी सलोख्याचे संबंध असलेल्या
डीकेटीईसारख्या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना अत्याधुनिक आयडिया लॅब, अॅपल लॅब, रिसर्च लॅब व नवनविन मशिनरीची उपलब्धता आहे.या सर्व सोयी सुविधांमुळे डीकेटीईमध्ये सक्षम अभियंता तयार होत आहेत.
डीकेटीईतर्फे विद्यार्थ्यांचे स्वागत करीत असताना आजपासून तुमच्या नावापुढे डीकेटीईचे ब्रँण्ड नेम लागले आहे की जे तुमच्या जीवनाला अर्थपूर्ण बनवण्यासाठी पुरेसे आहे.
डी-डिसिप्लीन, के-नॉलेज, टी-टेक्निकल नॉलेज,ई-एक्सलन्स म्हणजेच डीकेटीई हे नावच जणू काही डीकेटीईची ओळख आहे. त्यामुळेच इंजिनिअरींग क्षेत्रात डीकेटीई हा ब्रँड झाला आहे. हा ब्रँड अबाधित राखायची जबाबदारी ही नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची असल्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांनी डीकेटीई इन्स्टिटयूट ही जगभरात आदर्शवत इन्स्टिटयूट म्हणून ओळखली जाते.असे सांगत विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तम करिअरसाठी ५ मंत्र सांगितले. यामध्ये वाईट संगत, वाईट सवयी, सोशल मेडियाचा अवास्तव वापर टाळा, निष्काळजीपणा व पालकांची जागरूकता यासंबंधी मौलिक मार्गदर्शन केले.यावेळी उपसंचालिका प्रा.डॉ.सौ. एल.एस. आडमुठे यांनी विद्यार्थ्यांना तुमचे ध्येय हे समाजाला व इंडस्ट्रीला उपयोगी पडणारे असावे असे सांगून शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी यशाचा कानमंत्र दिला.
कार्यक्रमादरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी
करणा-या व आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट झालेल्या व परदेशात एम.एस. अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच सर्व वर्षातील प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा.एस.डी. गोखले व प्रा. एस.ए.सौंदत्तीकर यांनी या कार्यक्रमाचे तसेच प्रा.जे.आर. नागला यांनी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे सुत्रसंचालन केले.
या कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, डीन्स, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफीसर, रजिस्ट्रार, हॉस्टेल विभागप्रमुख आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन प्रथम वर्ष इंजिनिअरींग विभागप्रमुख प्रा. एस. ए. पाटील यांनी केले.