You are currently viewing आनंदोत्सव…..जुलमी राजवटीचा शेवट…अखेर सुंदरवाडीने सुटकेचा श्वास घेतला..

आनंदोत्सव…..जुलमी राजवटीचा शेवट…अखेर सुंदरवाडीने सुटकेचा श्वास घेतला..

रवी जाधवने का दिल्या सुंदरवाडी मुक्त दिनाच्या शुभेच्छा?

विशेष संपादकीय…

सावंतवाडी नगरपालिकेच्या दारातच सर्वांचे लक्ष वेधून घेणारा फलक झळकला आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाने “असा फलक का लावला?” असा प्रश्न मनात उपस्थित करत आनंदोत्सव सदरा खाली लिहिलेल्या फलकाचे फोटो देखील काढले. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काही वेळातच हा फलक जप्त केला, परंतु तोपर्यंत सावंतवाडीतच नव्हे जिल्ह्याच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यात सुंदरवाडी म्हणून ओळख असणाऱ्या नगरपालिकेच्या समोर नगराध्यक्ष पद संपुष्टात येऊन प्रशासकीय राजवट येतानाच लागलेला फलक चर्चेचा विषय ठरला. या फलकवरील अनेक मुद्दे खरोखरच विचार करण्यालायक असून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात देखील गोरगरीब मागासवर्गीय व्यक्तींवर का अन्याय होतो? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. रवी जाधव यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचलेल्या फलकावरील गोरगरिबांच्या रोजीरोटीला घातलेलं कुंपण असे वाक्य लिहून कुंपणावर लावलेला बॅनर एका असहाय्य सुशिक्षित बेरोजगार व्यक्तीच्या रोजीरोटीवर खोलवर केलेला घाव दाखवून देतो.

सावंतवाडी शहरातील एक सुशिक्षित बेरोजगार युवक रवी जाधव याने कोरोनाच्या काळात तात्पुरता उभारलेला स्टॉल नगरपालिका प्रशासनाने काढून माल जप्त केला म्हणून पालिकेसमोर तब्बल ११ दिवस भर पावसात कुटुंबियांसमावेत उपोषण केले होते. त्यावेळी पालिकेच्या सत्ताधाऱ्यांपैकी काहींनी पालिकेत जाताना उपोषणकर्त्या जाधव कुटुंबीयांकडे पाहत हसत थट्टा मस्करी केली होती याची आठवण करून देतानाच छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी छत्रपतींनी कधीच उच नीच असा भेदभाव केला नाही परंतु हे सत्ताधारी गोरगरिबांना छळत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ७२० दिवसांच्या सत्तेमध्ये गोरगरिबांवर अन्याय झाला का? हा प्रश्न मात्र शोधाचा विषय बनला आहे. एकीकडे सावंतवाडीत परप्रांतीय लोकांना व्यापारासाठी गाळे, भाजीवाल्यांसाठी शहराची शान असलेल्या मोती तलावाचा काठ, आणि मटका उद्योगपतींना शहरात जागोजागी टपऱ्या आदींसाठी खुलेआम जागा उपलब्ध करून दिली जात असताना एका स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणावर उपोषण करण्याची पाळी आणून सत्ताधाऱ्यांनी काय साध्य केले होते? असाही एक ठेवणीतला प्रश्न बॅनर पाहून हॅमर मारत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्य घटना लिहिली त्याला सात दशके उलटून गेली तरीही मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार तरुणाला न्यायासाठी का संघर्ष करावा लागतो असा प्रश्न बॅनर वर मांडून रवी जाधव यांनी १५ ऑगस्ट या स्वातंत्रदिनी आपण कुटुंबियांसमावेत पालिकेसमोर उपोषणाला बसलो असताना सत्ताधारी झेंडावंदन करून लाडू वाटत होते…. आणि तोच आनंदोत्सव फलकाच्या माध्यमातून जाहीररीत्या दाखवताना आजही सत्तेच्या गुर्मीत गोरगरिबांना चिरडले जात असल्याची अप्रत्यक्ष माहिती दिली आहे. खरोखरच स्वातंत्र्याची ७५ पूर्ण करत असलेल्या भारत देशात अशीही गरिबीची थट्टा का होते? असा भावनिक प्रश्न उभा राहत आहे. नारायण राणे यांनी जिल्ह्यातील गोरगरीब लोकांना आधार दिला, प्रत्येकवेळी गोरगरिबांच्या पाठीशी राहिले त्यामुळे आजही त्यांना सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान असल्याची आठवण करून देतानाच सावंतवाडी पालिकेतील राणेंच्याच पावलांवर चालणाऱ्यांमधील विरोधाभास प्रकर्षाने दिसून येतो.
स्टॉल प्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून म्हणा किंवा त्यांच्याच शब्दात सांगायचे तर सत्ताधाऱ्यांतील काही विकृत लोकांकडून अन्याय झालेल्या रवी जाधव यांनी आपल्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावतानाच आनंदोत्सव या सदराखाली “जुलमी राजवटीचा शेवट…बरे दिन चले गये….अखेर सुंदरवाडीने सुटकेचा श्वास घेतला”…..असे म्हणत “सुंदरवाडी मुक्ती दिनाच्या शुभेच्छा” देत सावंतवाडीचे आराध्य दैवत श्री उपरलकर-पाटेकर यांना सांगणे करत “या सावंतवाडीवर असे दिवस पुन्हा नको”, असे मागणे मागितले आहे.
रवी जाधव यांनी लावलेला फलक सावंतवाडी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी नक्कीच काही वेळात हटवला परंतु सावंतवाडीकर जनतेच्या हृदयापर्यंत गेलेल्या या फलकावरच्या मुद्द्यांमधून सावंतवाडीवासीयांकडे काय संदेश जातो हे येणारा काळच ठरवेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − one =