You are currently viewing इन्सुली चेकपोष्टवर ओव्हरलोड वाहतुकी विरुद्ध आरटीओची मोठी कारवाई

इन्सुली चेकपोष्टवर ओव्हरलोड वाहतुकी विरुद्ध आरटीओची मोठी कारवाई

निगुडे ग्रामस्थ सुभाष राणे यांच्या अर्जानंतर कारवाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात डंपर मधून खडीची ओव्हरलोड वाहतूक रोज राजरोसपणे सुरू असते. अनेकदा गावागावातील छोट्या रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर मुळे छोटे मोठे अपघात देखील होत असतात. परंतु ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे संबंधित आरटीओ विभाग कानाडोळा करत असतो. त्यामुळे ओव्हरलोड वाहतुकीबद्दल आरटीओ विभागाकडे वारंवार तक्रारी येई लागल्या.
निगुडे ग्रामस्थ सुभाष राणे यांच्या गाडीवर गावात येऊन कारवाई करत दंड आकारण्यात आला होता, परंतु दिवसाढवळ्या राजरोसपणे हायवेवरून इन्सुली-वेत्ये गावातील खडीची गोवा राज्यात दररोज ओव्हरलोड वाहतूक होत असताना मात्र त्याच्याकडे कानाडोळा केला जातो. सुभाष राणे यांच्या गाडीवर झालेल्या कारवाई नंतर हायवेवरून भरधाव ओव्हरलोड वाहतूक होत असते त्यावर कारवाई होण्यासाठी राणे यांनी लेखी अर्ज आरटीओ विभागाला दिला होता. सुभाष राणे यांच्या अर्जानंतर आरटीओ विभागाने इन्सुली चेकपोष्टवर मोठी कारवाई करत गोवा येथे ओव्हरलोड भरून खडी वाहतूक करणारे ३ डंपर पकडण्यात आले. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता ही कारवाई करण्यात आली.
आरटीओ विभागाकडून कारवाई झाल्यावर अशाप्रकारे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपर वर दुप्पट दंड आकारून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले असून सदर कारवाई साठी विशेष भरारी पथक नेमण्याचेही आरटीओ विभागाकडून सांगण्यात आले. अशाचप्रकारे वेत्ये येथून मोपा विमानतळासाठी देखील वाहतूक होत असते. दररोज होणारी ओव्हरलोड वाहतुकीमुळे ग्रामस्थांना देखील त्रास होऊ लागला, त्यामुळे राजरोसपणे होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीविरुद्ध आरटीओ विभागाकडे तक्रारी आल्याने ही कारवाई करण्यात आली. भविष्यात देखील संबंधित विभागाने अवैध रित्या होणाऱ्या वाहतुकीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 6 =