You are currently viewing थेंब आज हा पाण्याचा

थेंब आज हा पाण्याचा

नंदुरबार येथील ज्येष्ठ लेखिका कवयित्री, मराठी पाठ्यपुस्तक, एनएसएस थीम सॉंग, शॉर्टफिल्म आदींसाठी वेगवेगळी गाणी लिहिलेल्या सौ.सुनंदा भावसार यांची काव्यरचना

शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा
आभाळातील बहुमोलाचा,थेंब आज हा पाण्याचा

मोती बनुनी सरसर येती,वर्षेमधल्या सरीतूनी
माळ ओवते ,निसटून जाते , बावरते जणू परी कुणी
या मोत्यांचा संचय कर तू,प्रश्न तुझ्या रे जीण्याचा
आभाळातील बहुमोलाचा,थेंब आज हा पाण्याचा
|१|

आभाळातील ह्या मोत्याने,मातीमधुनी पिकती मोती
निसर्ग जाणी मोल तयाचे,तुम्ही माणसे का मग कोती?
संचय करता तिजोरीतल्या,खणखणत्या त्या नाण्याचा
आभाळातील बहुमोलाचा ,थेंब आज हा पाण्याचा
|२|

कशास ऐसा वेडा चाळा,स्वतः होऊनी ठगण्याचा
दृष्टिकोन तू बदल आता रे,निसर्गास ह्या बघण्याचा
तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा?
आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा !३!

सौ सुनंदा सुहास भावसार.

प्रतिक्रिया व्यक्त करा