You are currently viewing बांदा केंद्रशाळेचा १६८ वा वर्धापन दिन २१ केक कापून उत्साहात साजरा

बांदा केंद्रशाळेचा १६८ वा वर्धापन दिन २१ केक कापून उत्साहात साजरा

बांदा

समाजशील पिढी घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकांसोबतच शाळेची देखील आहे. बांद्यातील चार पिढ्यांना शिक्षण देणारी जिल्हा परिषद केंद्रशाळा ही ज्ञानमंदिराचा महासागर आहे. या शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी हे शाळेचा वाढदिवस साजरा करतात हे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या यशाचे गमक आहे असे गौरवोद्गार जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी येथे काढले.
बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेचा १६८ वा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. दळवी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर बांदा जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, इन्सुली जिल्हा परिषद सदस्या उन्नती धुरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर, केंद्रप्रमुख संदीप गवस, बँक आॅफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक अंकीत धवन डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, महेश धुरी, मनोज कल्याणकर, राजा सावंत, सेवानिवृत्त शिक्षिका अनुराधा धामापूरकर, प्रभारी मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, पालक यांनी स्वयंस्फूर्तीने बनविलेले २१ केक कापून २०२१मधील शाळेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख संदीप गवस यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. अनिशा दळवी पुरस्कृत ‘माझा सुंदर कोकण’ या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी निबंध स्पर्धेतील निबंधांचे संग्राह्य असलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन सभापती दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणित संबोध परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
उन्नती धुरी म्हणाल्या की, समाजाच्या विकासाचे प्रतीक ही शाळा असते. विद्यार्थ्यांनी उच्च क्षेत्रात भरारी घेतली तर शाळेचे नाव हे आपोआपच मोठे होते. त्यामुळे शाळेचे ऋण व्यक्त करण्याची ही प्रथा कायमस्वरूपी जोपासावी. मान्यवरांचे स्वागत निलेश मोरजकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक जे. डी. पाटील यांनी केले. आभार उर्मिला मोर्ये यांनी मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक समिती, माता-पालक समिती पदाधिकारी, सदस्य, पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =