सावंतवाडीत १८ डिसेंबर रोजी आयोजन
सावंतवाडी
सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेचे साहित्य संमेलन शनिवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३०वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. डॉ.राजन गवस (गारगोटी ) यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कादंबरीकार प्रा.प्रवीण बांदेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
‘समाज असतो म्हणून साहित्य असतं’ हा विचार प्रमाण माणून साहित्या बरोबर सामाजिक क्षेत्रात तळातल्या वर्गासाठी कार्यरत राहणाऱ्या व्यक्तींना जोडून घेण्याच्या उद्देशाने समाज साहित्य संघटना सिंधुदुर्ग ही संस्था सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर समाज साहित्य संघटनेतर्फे यावर्षी पासून समाज साहित्य पुरस्कार योजना जाहीर केली आहे. त्याचबरोबर समाजाशी जोडून राहणाऱ्या लेखकाना संमेलनाध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर भंडारभोग, चौंडक, धिंगाणा, कळप, तणकट ब-बळीचा असे व्यवस्थेत हस्तक्षेप करणारे कादंबरी लेखन करून साहित्य क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या डॉ.गवस यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर आपल्या चाळेगत,उजव्या सोंडेच्या बाहुल्या, इंडियन ॲनिमल फॉर्म अशा कादंबरीलेखनामधून आजच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रदूषित व्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रा. बांदेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
सदर संमेलन दोन सत्रात आयोजित करण्यात आले असून पहिल्या सत्रात उद्घाटन तसेच समाज साहित्य संघटनेतर्फे यावर्षी सिंधुदुर्ग सुपुत्र इतिहासकार “गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर समाज पुरस्कार” कष्टकऱ्यांच्या नेत्या उल्का महाजन यांना जाहीर करण्यात आला आहे. तर काशीराम साटम स्मृती “समाज साहित्य कादंबरी पुरस्कार” कृष्णात खोत यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण पहिल्या सत्रात गवस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दुसऱ्या सत्रात कवी प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कविसंमेलनात जुन्या-नव्या कवींचे काव्यवाचन होणार असून काव्य वाचनासाठी सहभागी होणाऱ्या कवींनी आपली नावे प्रा.मनीषा पाटील (९४२२८१९४७४) यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन संस्था अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह सरिता पवार यांनी केले आहे.