You are currently viewing खा.विनायक राऊत साहेब कोरोनावर मात करून लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होतील- आ.वैभव नाईक

खा.विनायक राऊत साहेब कोरोनावर मात करून लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होतील- आ.वैभव नाईक

कुडाळ प्रतिनिधी

आमचे मार्गदर्शक, शिवसेना सचिव,सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आमच्या कुटुंबातील एक सदस्य विनायक राऊत यांची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. हे ऐकून खरोखरच मनाला धक्का बसला. शिवसेनेचे आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी लोकांच्या सेवेसाठी कार्यरत असताना काळजी घेतली जाते मात्र हे करत असताना आम्हालाही कोरोनाची लागण होणार याची जाणीव होतीच परंतु कोरोनाला घाबरून आम्ही घरात न बसता ज्यांनी आपल्याला निवडून दिल त्या जनतेला कोरोनाचा फटका बसू नये यासाठी आमचे प्रयत्न राहिले. नेहमी काळजी घेऊन काम करत असताना नकळतपणे काही दिवसांपूर्वी मी, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी नेते व आता खा. राऊत साहेब देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
खा.विनायक राऊत साहेबांनी आपल्या वयाचा विचार न करता कोरोनाचा फैलाव झाल्यापासून गेल्या 6 महिन्याच्या कालावधीत सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातील लोकांच्या अडचणी, प्रश्न,समस्या सोडवण्यासाठी,लोकांची शासनदरबारी असलेली कामे करण्यासाठी मतदारसंघाबरोबरच मुंबईत वारंवार त्यांना ये-जा करावी लागली.रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात कोविड१९ टेस्टिंग लॅब , कोविड सेंटर होण्यासाठी व त्यासाठी शासनाचा निधी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मिळविण्यासाठी त्यांनी यशस्वीरित्या प्रयत्न केले.कोरोना संकट काळातही विविध विकासकामांना गती देण्यासाठी त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले.
मतदारसंघात गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत, प्रशासनाला सूचना करून वेगवेगळे लोकहिताचे निर्णय घेण्याबरोबर कार्यकर्त्यांना धीर देण्याचे काम राऊत साहेबांनी केले.मी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर माझ्या तब्बेतीची दिवसातून दोनदातरी विचारपूस करणे.माझ्याबरोबरच इतर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या लोकांची देखील विचारपूस करणे, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणे त्यादृष्टीने साधन सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे ही सर्व जबाबदारी संभाळत असतानाच आज खा.विनायक राऊत साहेब हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
खा. राऊत साहेबांशी संपर्क साधून चौकशी केली असता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.श्री देव रामेश्वराच्या कृपा आशीर्वादाने व सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या आशीर्वादाने लवकरच ते बरे होऊन पुन्हा सिंधुदुर्ग रत्नागिरी वासीयांच्या सेवेत रुजू होतील. अशी जिल्हावासीयांच्या वतीने प्रार्थना करतो असेेेे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − eleven =