महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ कवयित्री लेखिका प्रा.सौ.सुमती पवार यांचा अप्रतिम लेख.
जगात बुद्धिमान, प्रज्ञावंत , (जिनियस )आणि त्याहूनही
हुशार लोकांची वाण नाही आणि नसणार हे सत्य आहे.
पण फरक असतो तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन
जन्माला आला तो हुशार आणि अगदी रोजच्या जगण्याची ज्याला
भ्रांत आहे तो हुशार …
स्वामी विवेकानंदांनी पुस्तक हातात घेतले की ते लगेच
त्यांचे पाठ होत असे .. अशी त्यांची स्वत:ची साक्ष आहे..
पण कित्येक वेळा तोंडाला फाके पडत असत. त्यांचे चरित्र
वाचल्यावर किती अवघड परिस्थितीला त्यांना तोंड द्यावे
लागत होते हे कळते .. परिस्थिती अनुकुल असती तर…
बरेच काही वेगळे ही घडू शकले असते …
तीच गोष्ट आंबेडकरांची आहे .जातीभेदाचे असह्य चटके,
वडिलांची नोकरी , इकडून तिकडे गावाला जायलाही
बैलगाडी मिळत नसे. अहो , आमची बैलगाडी सुद्धा विटाळत
असे.. जनावरापेक्षाही माणसाला कमी लेखणारी आमची
जाती व्यवस्था..!
या जाती व्यवस्थेत किती लोकांचे संसार होरपळले याची
गणती नाही.. अशा या भयंकर समाज व्यवस्थेत पोटाची
खळगी भरणे जिथे अवघड होते तिथे शिक्षणासाठी किती
यातना या लोकांना भोगाव्या लागल्या असतील याची
कल्पना न केलेलीच बरी …” जावे त्याच्या वंशा” हेच खरे
आहे .अहो, जन्म मृत्यू कुठे कसा केंव्हा काहीच माहीत
नाही व काहीच हातात नाही.. झोपडीत की महालात
जन्म होणार ? माहीत नाही .. मग कोणी श्रेष्ठ कनिष्ठ
कसा असू शकतो ? आणि माणसाचा माणसाशी माणूस
नावाचा काही धर्म असतो की नाही? ज्यात माणुसकीच
नाही तो माणूस कसा असू शकतो ? जरा स्वत:ला त्या
परिस्थितीत टाकून पहा मग कसा जीवाचा तडफडाट
होईल तो…?ज्या गोष्टी आपल्या आधिनच नाहीत त्या
ठरवणारे आपण कोण? कामाची वाटणी.. समाजव्यवस्थेची
घडी बसावी म्हणून केली असेल तर कामे ती कामेच ना?
ती कशी श्रेष्ठ कनिष्ठ ? आणि मग वर्षानुवर्षे ते काम करणाराही कनिष्ठ असे कसे म्हणू शकतो आपण ..?
आणि दुर्दैवाने आंबेडकर कुटुंबियांना या साऱ्या परिस्थितीला
सामोरे जावे लागले . आंबेडकरांच्या हुशारीची तुलनाच होऊ
शकत नाही…! अहो, एक डिग्री घेण्यात जिथे आमचे अर्धे
आयुष्य निघून जाते .. तिथे ह्या मुलाने चिमणीच्या प्रकाशात
, चहा पाव खाऊन , अर्धपोटी ऱ्हाऊन , दिवसाचे १८/१८ तास
अभ्यास करून एक ही डिग्री घ्यायची बाकी ठेवली नाही .
अनेक विषयात ते पी एच् डी होते. त्यांच्या नावावर कोणती
डिग्री नाही …? असे विचारावे इतक्या पदव्या त्यांनी मिळवल्या
होत्या.आणि त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ..
म्हणून इतरांची हुशारी आणि आंबेडकरांची हुशारी यांची
तुलना नाही होऊ शकत ? म्हणून सर्व प्रज्ञावंतात ते असामान्य
ठरतात .. ..!
बडोद्याचे महाराज गुणग्राहक होते.अशा गोष्टींना ते प्रोत्साहन
देत असत. मग त्यांच्या स्कॅालरशीपवर आंबेडकर इंग्लंडला गेले. पण ती ही तुटपुंजी ठरली. मध्येच परत यावे लागले.
नंतर पुन्हा गेले. इकडे रमाईचे ही हाल चालूच होते.अशा बिकट परिस्थितीत शिकणारा हा एकमेव महामानव असावा
म्हणून त्यांचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते.आणि स्वातंत्र्याच्या
अशा धकाधकीच्या काळात भारतात कायदा मंत्री नि भारतासाठी कायदे तयार करणे म्हणजे भारताची घटना लिहिणे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हते . त्या साठी बाबासाहेबां-
सारख्या प्रज्ञावंताचीच गरज होती हे वेगळे सांगायलाच नको.
आम्हाला माणसे ओळखताच येत नाही हेच खरे आहे अन्यथा
ह्या प्रज्ञावंताला इतक्या बिकट परिस्थितीला सामोरे जावेच
लागले नसते. जो धर्म माणूस म्हणून जगू देत नाही तो त्यांनी
त्यागण्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही..(इथे मी फक्त
माणूस धर्माचा विचार केला आहे व मला वाटते जगात फक्त
तोच श्रेष्ठ धर्म आहे) . आपल्याला कुठल्याही राजकारणात
न पडता माणूस धर्माचाच विचार करायला हवा व त्यातच
मानवतेचे कल्याण आहे या विषयी कुणाचे ही दुमत असण्याचे
कारण नाही.. खरे नां ? विज्ञानाकडे प्रवास करतांना माणूस
अधिक अधिक शहाणा होत जाईल असे वाटले होते पण
अजून तरी तसे चित्र दिसत नाही .. माणूस उलटा प्रवास
करतो आहे की काय अशी सतत मनात भीती वाटते ..
हळू हळू विचार स्वातंत्र्यावरही घाला पडेल की काय?
असा ही प्रश्न भेडसावतो.आणि (हो, ही फक्त माझी मते आहेत .)धन्यवाद …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ५/१२/२०२१
वेळ: सायं. ५:५०