शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून खरेदी करण्याचे आवाहन
कुडाळ
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले आठ दिवस बंद ठेवलेली कुडाळ बाजारपेठ आज पासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे यांनी दिली. मात्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून खरेदी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणुन गेले आठ दिवस कुडाळ शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय, दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूस सहकार्य केले. जनता कर्फ्यू यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलेल्या शहरातील नागरिक, सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नगराध्यक्ष, नगरसेवक नगरपरिषद प्रशासन, पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी, पंचायत समिती प्रशासन, प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलिस यंत्रणा, पत्रकार, कुडाळ तालुक्यातील सर्व जनतेचे भोगटे यांनी आभार मानले. तसेच तालुक्यातील कसाल, ओरोस, पणदूर, पिंगुळी, हूमरमळा (वालावल), घावनळे, माणगाव गावातील सर्व व्यापारी व नागरिकांचेही आभार मानले आहेत. उद्यापासून सर्व दुकाने पूर्ववत सुरू होतील, असे भोगटे यांनी सांगितले. मात्र सामाजिक अंतर राखून, मास्कचा वापर करूनच खरेदी करा, असे आवाहनही त्यांनी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्यावतीने केले आहे.