You are currently viewing सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेचा इतिहासकार कृष्णराव केळुसकर पुरस्कार उल्का महाजन.. तर कादंबरी पुरस्कार कृष्णात खोत यांना जाहीर!

सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेचा इतिहासकार कृष्णराव केळुसकर पुरस्कार उल्का महाजन.. तर कादंबरी पुरस्कार कृष्णात खोत यांना जाहीर!

सावंतवाडी येथे डिसेंबर मध्ये समाज साहित्य संमेलनात पुरस्काराचे वितरण!

सिंधुदुर्ग :

समाज साहित्य संघटना, सिंधुदुर्गतर्फे यावर्षीपासून पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. संघटनेचा इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘समाज पुरस्कार’ कष्टकरी वर्गाच्या नेत्या उल्काताई महाजन (पनवेल) यांना तर कै.काशिराम आत्माराम साटम यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा समाज साहित्य कादंबरी पुरस्कार कादंबरीकार कृष्णात खोत (कोल्हापूर) यांच्या ‘शब्द पब्लिकेशनने’ प्रकाशित केलेल्या ‘रिंगाण’ कादंबरीला जाहीर झाला आहे.या पुरस्कार योजनेसाठी जेष्ठ समीक्षक प्रा.नीतीन रिंढे यांचे सहकार्य लाभले.

प्रत्येकी रोख दहा हजार, स्मृती चिन्ह, शाल, ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सावंतवाडी येथे होणाऱ्या ‘समाज साहित्य संमेलनात’ सदर पुरस्काराने श्रीम. महाजन आणि श्री. खोत यांना गौरविण्यात येणार आहे.

समाज साहित्य संघटना अलीकडल्या काळात सिंधुदुर्गात निष्ठेने कार्यरत आहे. कोणत्याही काळात अपवादात्मक उत्तम साहित्य लेखन करणारे कवी लेखक कार्यरत असतात. त्याचप्रमाणे अपवादानेच समाजाप्रती काम करणारी माणसे कार्यरत असतात.या सर्व व्यक्ती प्रसिद्धीपासून दूर राहतात. अशा सर्वांचा शोध घेऊन समाज साहित्य संघटनेतर्फे त्यांना पुरस्काराने गौरविण्याचा निर्णय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर समाज साहित्य संघटनेचा पहिला इतिहासकार गुरुवर्य केळुसकर यांच्या नावाचा ‘समाज पुरस्कार’ शेतकरी शोषित कष्टकरी वर्गासाठी लढा उभारणाऱ्या आणि अशा वर्गाच्या जमिनी विविध प्रकल्पांच्या नावाखाली उद्योगपतींच्या ताब्यात जायला विरोध करून त्या पुन्हा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कार्यरत राहिलेल्या श्रीम.उल्का महाजन यांना जाहीर करण्यात आला आहे. गुरुवर्य केळुसकर हे सिंधुदुर्ग-केळूसचे सुपुत्र.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले गुरू. केळुसकर यांनीच पहिले शिवचरित्र लिहिले आणि बाबासाहेबांच्या हातात बुद्ध चरित्रही त्यांनीच ठेवले. अशा महान इतिहासकाराचे स्मरण कायम राहावे म्हणून त्यांच्या नावाने देण्यात आलेला हा पुरस्कार मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने स्वीकारत असल्याची भावना उल्का महाजन यांनी व्यक्त केली आहे.

समाज साहित्य संघटनेने दुसरा पुरस्कार या वर्षी कादंबरीसाठी जाहीर केला असून कै.शिवराम आत्माराम साटम (आयनल) यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी कादंबरीकार श्री.कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ कादंबरीची निवड करण्यात आली आहे. मागील 10 वर्षातील महत्वाच्या कादंबरी पैकी ही एक कादंबरी असल्याचे मत मराठी साहित्यातील अनेक मान्यवरांनी आजवर व्यक्त केले आहे. “साहित्यिक हा समाजाचाच भाग असतो. समाजापासून दूर जाऊन लेखक लिहू शकत नाही. त्यामुळे ‘समाज साहित्य’ या नावाने चालविल्या जाणाऱ्या साहित्य चळवळीतर्फे देण्यात येणारा कादंबरी पुरस्कार मला प्राप्त झाला याचा आनंद होत आहे.” अशी भावना कादंबरीकार खोत यांनी व्यक्त केली आहे. समाज साहित्य संमेलनाच्या अधिक माहितीसाठी संपर्क मधुकर मातोंडकर  ९४२३५१३०७२ साधावा.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =