You are currently viewing पालिकेकडून केवळ दिखाव्यासाठी स्वच्छता अभियान – पुंडलीक दळवी

पालिकेकडून केवळ दिखाव्यासाठी स्वच्छता अभियान – पुंडलीक दळवी

सावंतवाडी

नगराध्यक्ष संजू परब यांनी कोणाला अंगावर घेण्याची भाषा करू नये, निवडणुकीचा आखाडा जवळच आहे. त्यामुळे कोण-कोणाला शिंगावर घेतील? हे लवकरच दिसेल, असा टोला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी आज येथे लगावला. दरम्यान शहरात पालिकेकडून केवळ दिखाव्यासाठी स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मात्र प्रत्यक्षात ती स्वच्छता या ठिकाणी दिसत नाही. शहराच्या सर्व मुख्य प्रवेशद्वारांच्या समोरच अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. त्यामुळे याकडे सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री.दळवी बोलत होते.

यावेळी उद्योग-व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, माजी नगरसेवक तथा शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, संतोष जोईल, नवल साटेलकर, सिद्धेश तेंडोलकर, अर्षद बेग, आसिफ ख्वाजा, जहिरा ख्वाजा आदी उपस्थित होते.

श्री.दळवी पुढे म्हणाले, शहरात स्वच्छता अभियान केवळ दिखाऊपणासाठी राबविले जात आहे. मुख्य रस्ते आणि बाजारपेठ वगळता इतर ठिकाणी अस्वच्छताच पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागात ही स्वच्छता कायम ठेवा, असे त्यांनी सांगितले. तर शहरात सुरू असलेले जिओ केबल खुदाईचे काम चुकीच्या पद्धतीने होत आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. आमचा विकास कामांना विरोध नाही, मात्र ठेकेदाराच्या हेकेखोरपणाला आम्ही विरोध करत आहोत. असे सांगत शहरात इतर ठिकाणी दुकाना घरांसमोर बोरअर करून केबल का टाकण्यात आली ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा