You are currently viewing मालवण पंचायत समितीच्या दर्जाचा,  खासदार, पालकमंत्री, आमदारांनी पाठलाग करावा – निलेश राणे

मालवण पंचायत समितीच्या दर्जाचा,  खासदार, पालकमंत्री, आमदारांनी पाठलाग करावा – निलेश राणे

लोककला महोत्सवाची सांगता…

मालवण

मालवण पंचायत समितीने आयोजित केलेला लोककला महोत्सव हा उल्लेखनीय उपक्रम आहे. पंचायत समितीच्या कामाला जो दर्जा प्राप्त झाला आहे, त्या दर्जाचा पाठलाग करण्याचे काम पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी करावे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी येथे केले.

मालवण पंचायत समितीच्या वतीने आयोजित लोककला महोत्सवाचा सांगता सोहळा भाजप नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत आज झाला. यावेळी श्री. राणे यांच्या हस्ते नटराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्यासपीठावर सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, उद्योजक दीपक परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, बाबा परब, पंचायत समिती सदस्य मनीषा वराडकर, बाबा परब, आबा हडकर, भजनीसम्राट भालचंद्र केळुसकर, राजू बिडये, विक्रांत नाईक आदी उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती तर्फे निलेश राणे व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर भजनसम्राट भालचंद्र केळुस्कर यांना निलेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

श्री. राणे म्हणाले, इथल्या लोककला या पुढच्या पिढीला कळल्या पाहिजेत. यादृष्टीने पंचायत समितीने आयोजित केलेला लोककला महोत्सव कौतुकास्पद आहे. पंचायत समितींना मिळणारा सेस फंड गेले दीड वर्ष मिळालेला नाही, त्यामुळे पंचायत समिती चालवायची कशी हा प्रश्न आहे. सरकारची मदत नसतानाही मालवण पंचायत समिती सातत्याने कार्यक्रम घेत आहे, पंचायत समिती जे काम करतेय ते पालकमंत्री, आमदार, खासदार करत नाहीत, त्यांनी राणे काय करतात हे बघण्यापलीकडे मालवण पंचायत समितीच्या कामाच्या दर्जाचा पाठलाग करावा असे श्री. राणे म्हणाले. आज जिल्ह्यात पाऊस पडत असून जिल्ह्याच्या परिस्थितीवर कोणी बोलत नाही. ओला दुष्काळ जाहीर करावा की नाही याबाबतची भूमिका भाजप घेणार आहे. आज मुख्यमंत्री शस्त्रक्रियेमुळे गायब आहेत, आता दोन महिने दिसणार नाहीत, अशी टीकाही श्री राणे यांनी केली.

यावेळी अजिंक्य पाताडे यांनी वृद्ध कलाकारांना शासकीय मानधन मिळविताना अडचणी येत असल्याने या लोककला महोत्सवाद्वारे कलाकारांच्या कला सादरीकरणाची चित्रफीत व फोटो उपलब्ध होऊन पंचायत समितीचे प्रमाणपत्रही दिले जात आहे, त्यामुळे मानधन मिळण्यातील पुराव्याच्या अडचणी कमी होतील असे सांगितले. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सुदेश आचरेकर, अशोक सावंत, संतोष साटविलकर यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन चंद्रसेन पाताडे यांनी केले. कृषी अधिकारी संजय गोसावी यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा