You are currently viewing सिंधुदुर्ग विमान प्रवासात वारंवार अडथळे; एक वेगळीच समस्या

सिंधुदुर्ग विमान प्रवासात वारंवार अडथळे; एक वेगळीच समस्या

अलीकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ सुरू झालं आहे. चिपी विमानतळ सुरू होऊन दोन महिनेही उलटले नाहीत. तोपर्यंत याठिकाणी एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. चिपी विमानतळ परिसरात गवताळ प्रदेश असल्याने याठिकाणी 25 ते 30 कोल्ह्यांनी वास्तव्य केलं आहे. हे कोल्हे वारंवार विमानतळ परिसरात प्रवेश करून धावपट्टीवर धुडगूस घालत आहेत. त्यामुळे टेक ऑफ आणि लॅंडिंग करत असताना, वारंवार अडथळे निर्माण होतं आहेत. यामुळे वैमानिकांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दर आठवड्यात दोन ते तीन वेळा असे प्रकार घडत असल्याची माहिती विमानात सेवा देणाऱ्या एका कर्मचाऱ्याने दिली आहे. विमानतळावर तैनात असलेले कर्मचारी कोल्ह्यांना पळवून लावण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात. पण हे कोल्हे पुन्हा पुन्हा विमानतळ परिसरात येतात. त्यामुळे लँडिंग आणि टेक ऑफ करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतं आहेत. याचा विमान सेवेवर देखील परिणाम होत असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.

चिपी विमानतळ 275 एकरात पसरलं आहे. चिपी विमानतळ परिसरात आसपास घनदाट गवताळ प्रदेश असल्याने याठिकाणी सोनेरी कोल्ह्यांनी वास्तव्य केलं आहे. संबंधित कोल्ह्यांची शिकार करणं हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे विमानतळ कर्मचारी त्यांना वारंवार हुसकावून लावत आहेत. सोनेरी कोल्हे प्रामुख्याने गवताळ प्रदेशात वास्तव्य करतात, त्यामुळे तूर्तास हे कोल्हे येथून जाण्याची शक्यता फार कमी असल्याचंही कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे संबंधित कोल्ह्यांना पकडण्याची परवानगी विमानतळ प्रशासनानं वन विभागाकडे मागितली आहे. वन विभागानं परवानगी दिल्यास कोल्ह्यांना पिंजऱ्यात जेरबंद करून त्यांना सुरक्षित अधिवासात सोडण्यात येईल, अशी माहिती चिपी विमानतळ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा