दोडामार्ग
दोडामार्ग तालुका निर्माण केला,दोडामार्गात सर्व कार्यालये आणली.युवकांना रोजगार मिळावा म्हणून आडाळी एमआयडीसी मंजूर केली.मात्र या आघाडी सरकारने विकासकामांत खो घातला आहे.मात्र तुम्ही एकत्र येऊन काम करा.जनतेचे सेवक म्हणून काम आणि आणलेल्या विकासाचा फायदा करून घ्या असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे येथे दोडामार्ग तालुका पदाधिकारी बैठकीत केले.
दोडामार्ग तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आज पार पडली.मात्र या बैठकीला प्रसार माध्यमांना बाजूला ठेवण्यात आल्याने नेमकं या बैठकीत काय घडलं याबाबत दोडामार्गात चर्चा रंगत आहे.
केंद्रीय मंत्री राणे यांनी या बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केवळ सबसिडी मिळवण्यासाठी जिल्ह्यात गाड्या घेऊन फिरण्याचे काम करू नका असा घरचा आहेर दिला.माजी उपनगराध्यक्ष तथा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केलेले स्वागत राणे यांनी स्मितहास्य करीत स्वीकारले.
यावेळी भाजपचे संघटन मंत्री शैलेंद्र दळवी,जिल्हाध्यक्ष राजन तेली,तालुका पक्ष निरीक्षक प्रमोद कामत, तालुकाध्यक्ष प्रवीण गवस,शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिशा दळवी,शैलेश दळवी,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी,महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे आदी उपस्थित होते.
दोडामार्ग तालुक्यात काही महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही संघटनात्मक बैठक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.मात्र दोडामार्गात असलेल्या पक्षांतर्गत मतभेदांमुळे ही बैठक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत घेतल्याची चर्चाही भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत होती.
दरम्यान आगामी निवडणुकीत शत प्रतिशत भाजपा हा नारा घेऊन काम करण्याचे आदेश राणे यांनी देत निवडणुकीत गद्दारी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही दिला.