You are currently viewing एकजूट कायम ठेवा : एसटी कर्मचाऱ्यांना माजी खासदार निलेश राणे यांचे आवाहन

एकजूट कायम ठेवा : एसटी कर्मचाऱ्यांना माजी खासदार निलेश राणे यांचे आवाहन

कुडाळ
कुडाळात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी दिली भेट
तुमचा संप मोडून काढण्यासाठी सरकार सगळ्या प्रकारे प्रयत्न करणार, मात्र आपली एकजूट कायम ठेवा, ती तुटू देऊ नका, भाजप तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, निलंबन करून सेवा संपवणे एवढी गोष्ट सोपी नाही आणि आमचा विश्वास न्यायालयावर आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांनी केले. ते कुडाळ येथील एस. टी. बस कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी बोलत होते.
कुडाळ आगारातील बस कर्मचारी संपामध्ये सहभागी असून त्यांना माजी खासदार निलेश राणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, माजी सभापती मोहन सावंत, जिल्हा कार्यकारणीचे आनंद शिरवलकर, विशाल परब, सभापती सौ नूतन आईर, युवा मोर्चाचे रूपेश कानडे, श्रीपाद तवटे, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, साक्षी सावंत, महिला जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर,राकेश नेमळेकर,सरपंच नागेश परब,चंदन कांबळी,अमित तावडे,संदेश सुकळवाडकर, तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. .
यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की, एस.
टी. बस कर्मचाऱ्यांना बद्दल ठाकरे सरकारला कोणतीही सहानुभूती नाही. त्यामुळे हा संप मिटवण्यासाठी एवढे दिवस घेतले. आता हा संप मोडीत काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सोडल्या जात आहेत.

मात्र तुम्ही तुमची एकजूट तशीच ठेवा ती तुटू देऊ नका. जर ही एकजूट आता तुटली तर तुम्हाला कधीच न्याय मिळू शकणार नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांना वाटतं की कर्मचारी आपल्या पायापाशी येतील. लक्षात ठेवा कधीही त्यांच्या पायापाशी जाऊ नका.

ते आपल्या पायापाशी आले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही कर्मचारी आहात. सरकारच्या विविध आदेशांचे पालन करून महामंडळ असून सुद्धा कायम कार्यरत आहात. मग यांच्या पायाशी का जावे ?

तुम्हाला नोकरीतून काढण्याच्या धमक्याही दिल्या जातील. पण आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. तुमच्या या नोकऱ्यांसाठी आम्ही न्यायालयात जाऊ, पर्यायाने महाराष्ट्र पेटवू, पण तुम्हाला न्याय देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. जे काही गुन्हे घ्यायचे असतील ते आम्ही भाजप म्हणून आमच्या अंगावर पहिले घेऊ, पण तुम्हाला न्याय देऊ, या ठाकरे सरकारला तुम्हाला न्याय द्यावाच लागेल, तुमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा