जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी, लेखक दीपक पटेकर यांचा अप्रतिम ललित लेख…
आठवतंय का तुला ते सागराच्या तटावरील उंच खडकावर एकांतात बसणे… शून्यात असलेल्या नजरेने लाटांचे एकमेकांशी बिलगणे तू आसक्त होऊन पाहणे… हळूहळू अस्ताकडे जाणाऱ्या सूर्याच्या चंदेरी छटा सोनेरी मुकुट लेवूनी नाजूकपणे विसावतात खोलवर सुमुद्रात अंतर्मनातील खदखदीने थरथरणाऱ्या लाटांच्या ललाटी लुप्त होण्यासाठी….
मनमोहक दिसतं ते दृश्य… सूर्याने लालेलाल होऊन थेट पाण्याच्या कवेत शिरताना..नकळत हृदयात घर करणाऱ्या प्रियकरासारखं.
तू न्याहाळत असतेस सूर्याचं पाण्याशी होणारं मिलन.. आठवत असतेस तुझा भूतकाळ… फेसाळणाऱ्या लाटांमधून उडणारे पाण्याचे नाजूक तुषार अंगावर झेलत…लाटांशी झोंबणाऱ्या वाऱ्याच्या हळूवार स्पर्शाने अंगावर रोमांच उभे राहतात..
गालाशी खट्याळ पणे खेळणाऱ्या तुझ्या केसांच्या नाजूक बटा बाजूस सारताना अंगावर उभा राहिलेला काटा स्वतःला सावरत होता…. तू मात्र मनातल्या मनात लाजत…मुरडत गालातल्या गालात हसत मनोमन आनंद लुटत होतीस लाटांच्या किनाऱ्याशी भेटीचा अन सूर्याच्या पाण्याशी बिलगतानाच्या प्रणयाचा…
अग्नी ज्वालांनी लालबुंद झालेला, तापलेला सूर्य अंगातली सगळी गर्मी जणू पाण्यात उतरून थंड करू पाहत होता…
किती विलोभनीय दिसतं ते भेटीचं दृश्य…
जसजसा पाण्याच्या कुशीत शिरतो तसतसा सूर्य लालबुंद होत आकाराने वाढत जातो जसा काय अत्यानंदाने फुलत गेला तसाच…
त्याच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता आणि तुझ्या भावनांना….
सूर्य पाण्याशी बिलगला….
एकरूप होऊन प्रेमात आकंठ डुबला…. सर्वत्र नीशेचा काळोख पसरवून…
चंद्राच्या शीतल छायेत लाटा चंद्राच्या चंदेरी छटा लेवूनी धावत होत्या किनाऱ्याच्या ओढीने भेटीस किनाऱ्याकडे…
उसळत, प्रेमाने उफाळत अलगद येऊन विसावत होत्या किनाऱ्याच्या कुशीत….अगदी काहीच क्षणांसाठी…
किनारा प्रेमाने जवळ घेतो न घेतो तोच पुन्हा माघारी फिरत होत्या…खोलवर सागरात अस्तित्व हरविण्यासाठी…
चेहऱ्यावरील निराशाही लपत नव्हती अन क्षणिक भेटीचा आनंदही ओसंडून वाहत होता…
जाताना मात्र लाटा किनाऱ्याचं दुःख धुवून पुसून नेत होत्या…आणि आपल्या प्रेमाच्या खुणा किनाऱ्यावर मुक्तहस्ताने सोडत होत्या…
किनाराही आतुर असायचा लाटांशी मिलनासाठी…
त्याला पुसटशी कल्पनाही नसायची…
आपल्या दोघांच्या मिलनाने आपल्याच अंगाची धूप होते त्याची…
पण….. काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी गमवावे लागले..
अगदी तसंच….
लाटांशी होणाऱ्या मिलनासाठी….त्या क्षणिक प्रणय सुखासाठी…किनारा न्योछावर करत होता….आपली कवचकुंडले….
प्रेमात केवळ घेण्यापेक्षा देण्यातही मजा असते याचीच प्रचिती येत होती….किनाऱ्याच्या उदार अंतःकरणाकडे पाहून…
दिसत होती लाटा आणि किनाऱ्याच्या प्रेमाची खोली…जाणवत होतं त्यांच्या अतूट प्रेमातील त्यांना मिळणारं सुख…
तू एकटक न्याहाळत होतीस… दोन्ही प्रेमी युगुलांचं होणारं मिलन… अन प्रेमासाठी केलेला त्यागही….
©[दिपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६