You are currently viewing महाराष्ट्रातील हजारों एस.टी. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्या, मध्यस्थी करून संपावर तोडगा काढा

महाराष्ट्रातील हजारों एस.टी. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्या, मध्यस्थी करून संपावर तोडगा काढा

इंटक काँग्रेस संघटनेची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विंनती

कणकवली

एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस लांबत आहे. राज्यसरकार आणि एसटी कामगार यांच्यात चर्चा होऊन सुद्धा संप मिटत नाही.योग्य तोडगा निघत नाही.त्यामुळे आपण या संपाचे धुरा संभाळून सरकार आणि कामगार यांच्यात निर्णय घडवावा,यापूर्वी अनेक निर्णय आपण घेतले आणि महाराष्ट्रास न्याय मिळवून दिला आहे . तसाच न्याय महाराष्ट्रातील हजारों एस.टी. कर्मचाऱ्यांना मिळवून द्यावा अशी मागणी एसटी कामगारांच्या वतीने इंटक कॉग्रेस कामगार संघटनेने केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्हा नियोजनाच्या सभेसाठी आले असता इंटक संघटनेचे नेते विभागीय अध्यक्ष अशोक राणे, विभागीय सचिव पांडुरंग गावडे व कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले आणि विंनती केली.

निवेदनात म्हटले आहे की,वारंवार वेतन वाढवा आणि शासनात विलिनीकरण करा अशी मागणी व संघर्ष करुनही पदरात काही पडत नसल्याने नाईलाजाने सर्व कर्मचारी संघटना विरहीत संपात उतरले आहेत. कर्मचारी विलिनीकरणावर ठाम असलेले व दिलेली मुदत व निर्णय यास विलंब लागणार असल्याने संप मिटणे अशक्य झाले आहे . कामगारांचे आर्थिक प्रश्न सुटत नसल्याने कामगार त्रस्त व मेटाकुटीला आल्याने राज्यात ३८ कर्मचाऱ्यांनी जीवाला कंटाळून आत्महत्या केल्याचे विदारक चित्र आहे . त्याचप्रमाणे संपामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने कर्मचारी अधिक आक्रमक झाला आहे . त्याचप्रमाणे संपामुळे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवासीवर्ग , कर्मचारी , विद्यार्थी , जेष्ठनागरिक यांचे राज्यामध्ये हाल होत आहेत . यातून तातडीने मार्ग काढणे सर्व बाजूंनी विचार करता आवश्यक झाले आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १०० टक्के संप सुरु असल्याने वरिल समस्येचा तोडगा व मार्ग काढण्यासाठी सद्यस्थितीत रा.प. प्रशासन , सरकार व विरोधी पक्ष यांना एकत्र करून कर्मचान्यांच्या मागण्याबाबत सर्वमान्य निर्णय घेण्यासाठी आपण तातडीचे प्रयत्न करावेत अशी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आपणांस कळकळीची विनंती करण्यात येत आहे . यापूर्वी अनेक समस्या प्रश्न संप , आंदोलनाबाबत आपण जाणीवपूर्वक आग्रही राहून आपणा सारख्या सिंधुदुर्गातील भूमीपुत्राने , मान्यवर नेत्याने त्या मार्गी लावून सिंधुदुर्ग जिल्ह्यास व त्या योगे महाराष्ट्रास न्याय मिळवून दिला आहे . तसाच न्याय महाराष्ट्रातील हजारों एस.टी. कर्मचाऱ्यांना मिळवून द्यावा व त्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन संपाची समस्या मार्गी लावावी अशी मागणी इंटक एसटी कर्मचारी संघटनेने केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा