You are currently viewing पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांचे सिंधुदुर्गात होणार भव्य स्वागत

पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांचे सिंधुदुर्गात होणार भव्य स्वागत

दिल्ली राष्ट्रपती भवन येथे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. 13 नोव्हेंबर रोजी येणारे पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे स्वागत सिंधुदूर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदूर्ग संघटना, पिंगुळी ठाकर समाज ग्रामस्थ मंडळ पिंगुळी व ठाकर आदिवासी कला आंगण पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सिंधुदूर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदूर्ग संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान रणसिंग यांनी दिली.

कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहात सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदुर्गच्यावतीने ही पत्रकार परिषद भगवान रणसिंग यांनी घेतली. यावेळी पिंगुळी ठाकर समाज ग्रामस्थ मंडळाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा ठाकर समाज संघटनेचे सल्लागार भास्कर गंगावणे, जिल्हा उपाध्यक्ष वैभव ठाकुर, उपाध्यक्ष शंशाक अटक, जिल्हा सचिव दिलीप मसगे, पिंगुळी उपसरपंच सागर रणसिंग, विठ्ठल सिंगने, उमेश ठाकुर उपस्थित होते.

यावेळी रणसिंग यांनी सांगितले की सन 2021 सालचा भारत सरकारचा सर्वोच्च मानाचा पद्मश्री पुरस्कार कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार परशुराम गंगावणे यांना जाहिर झाला आहे. हा पुरस्कार सिंधुदूर्ग जिल्ह्याला मिळाला बहुमान असुन तो ठाकर लोककलांचा सन्मान आहे. सदर पुरस्काराचे वितरण दि. 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे होणार आहे.

त्यानंतर गंगावणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.13 नोव्हेंबर रोजी आगमन होणार आहे. यावेळी त्यांचे स्वागतासाठी व शुभेच्छा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज सिंधुदूर्ग संघटना, पिंगुळी ठाकर समाज ग्रामस्थ मंडळ पिंगुळी व ठाकर आदिवासी कला आंगण पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या रॅलीला गुलमोहर हॉटेल कुडाळ येथुन सकाळी ठिक 10 वा. सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर पंचायत समिती कुडाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना, गांधी चौक- जिजामाता चौक,संत राऊळ महाराज कॉलेज चौक, पिंगुळी म्हापसेकर तिठा, राऊळ महाराज मठ, श्री देव रवळनाथ मंदिर पिंगुळी, बडगणेश मंदिर पिंगुळी, वरंडेश्वर मंदिर पिंगुळी, भद्रकाली मंदिर येथे सत्कार कार्यक्रम व ठाकर आदिवासी कला आंगण येथे रॅलीची सांगता होणार आहे.

परशुराम गंगावणे यांनी ठाकर कला जोपासण्याचे काम केले. त्यांना पद्मश्री पुरस्कार देवुन ठाकर कलेची दखल घेतल्याबद्दल केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचे आभार रणसिंग यांनी मानले.ठाकर आदिवासी कला आंगण येथे गंगावणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे असे भास्कर गंगावणे यांनी सांगितले.

या रॅलीमध्ये जिल्ह्यातील ठाकर समाजातील आदिवासी कलांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे, असे शशांक आटक यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =