लवकरच गव्यांचा बंदोबस्त करा : शेतकऱ्यांची मागणी.
वैभववाडी
सह्याद्री पट्ट्यातील नावळे गावात गवा रेड्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस सुरू आहे. बागायती शेतीसह खरीप हंगामातील भात, नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात गव्यांकडून नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नावळे येथील महेश रावराणे तसेच कृषी महाविद्यालय सागुळवाडीच्या नावळे येथील काजू बागेत सतत रात्री गव्यांनी धुमाकूळ घालत महेश रावराणे यांच्या 15 ते 20 झाडे तर कृषी महाविद्यालय सागुळवाडीच्या नावळे येथील बागेतील 20ते 25 झाडाचे नासधुस केली आहे. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. श्री रावराणे यांनी चार वर्षांपूर्वी मोठ्या मेहनतीने वेंगुर्ला चार व सात या कलम काजू रोपांची लागवड केली आहे. दरवर्षी काजू बाग स्वच्छ करून त्यांना खत घालून त्यांची जोपासना केली होती. यावर्षीपासून उत्पादन सुरू होणार होते. मात्र गवा रेड्यांनी ही काजू कलमे शिंगाणे पूर्णपणे उपटून दहा फुटापर्यंत लांब नेऊन टाकली आहेत. तर काही काजू कलमे पिळवटून टाकली आहे. अशाच प्रकारे या अगोदर ही काजू बागेत घुसून काजू कलमांची नासधूस केलेली आहे. आत्तापर्यंत जवळपास 50 पेक्षा जास्त काजू कलमांची नासधुस केली आहे. शासनाने नुकसान भरपाई देण्यापूर्वी गवा रेड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. शासनाकडून मिळणारी भरपाई व एक झाड वाढवण्यासाठी होणाऱ्या खर्चाचा हिशोब केल्यास मिळणारी भरपाई अत्यंत तुटपुंजी आहे. शासकीय पातळीवर याचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नावळे गावातील शेतकऱ्यांचे भात शेती, नाचणी शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र मिळणारी नुकसान भरपाई कमी असल्याने त्यासाठी लागणारे कागदपत्र यांना येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी वन विभागाकडे प्रस्ताव करण्यास टाळाटाळ करीत आहे. वैभववाडी तालुक्यात दिवसेंदिवस गवा रेड्यांचा मोठ्याप्रमाणात उपद्रव सुरू झाला असून तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील ऊस शेतीबरोबरच आंबा काजू बागांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान भविष्यात चिंतेची बाब असून शासनाने याकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. राधानगरी अभयारण्य हे सह्याद्रीच्या रांगेत असून तेथूनच गवा रेड्याचे कळप कोकणात उतरले आहेत. अशाप्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शेती दुरापास्त होणार आहे.