सर्व आगारांमधील कर्मचारी संपात सहभागी : सोमवारी सकाळपासून केले काम बंद आंदोलन सुरू
कणकवली
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व इतर मागण्यांसाठी राज्यभरात सुरू असलेल्या संपामध्ये सिंधुदुर्ग विभागातील कर्मचारीही सोमवारपासून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने महामंडळाची वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली होती.
विविध मागण्यांसाठी सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्रित येत ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेमुदत उपोषण सुरू केले होते. यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनानुसार उपोषण मागे घेण्यात आले असले तरीही महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे ही कर्मचाऱ्यांची मागणी होती. त्यामुळे या मागणीसाठी गेले बारा दिवस राज्यभरात ठिकठिकाणी काम बंद सुरू करण्यात आले होते. सिंधुदुर्ग विभाग मात्र यात सहभागी झालेला नव्हता. परंतु सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने एसटी महामंडळाची संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. येथील बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत महामंडळाचे शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे यासाठी जोरदार घोषणाबाजीही केली. रा.प. महामंडळाच्या सूत्रांची संपर्क साधला असता सिंधुदुर्ग विभागामध्ये सोमवारी सकाळपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने महामंडळाची वाहतूक व्यवस्था पूर्णत कोलमडली असल्याचे सांगण्यात आले. यामुळे सकाळच्या सत्रात शासकीय सेवेत जाण्यासाठी बसस्थानकावर आलेल्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान सकाळच्या सत्रात विजयदुर्ग आगारातील काही किरकोळ बसेस वगळता संपूर्ण वाहतूक ठप्प झाली असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.