You are currently viewing ठेकेदारामुळेच पं. स. इमारतीचे काम रखडले – अरविंद रावराणे

ठेकेदारामुळेच पं. स. इमारतीचे काम रखडले – अरविंद रावराणे

पंचायत समिती मासिक सभा संपन्न

वैभववाडी
ठेकेदारामुळेच पंचायत समिती इमारतीचे काम अनेक वर्षे रखडले आहे. हा सभागृहाचा अपमान आहे. त्या ठेकेदाराला शिक्षा करा. इमारती चे काम पाच ते सहा वर्षे आपण मार्गी लावू शकत नाही. मग तालुक्याचा विकास कसा करणार अशी खंत उपसभापती अरविंद रावराणे यांनी व्यक्त केली.
वैभववाडी पंचायत समिती मासिक सभा सभापती अक्षता डाफळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती अरविंद रावराणे, मंगेश लोके, लक्ष्मण रावराणे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, स.गटविकास अधिकारी शशिकांत भरसट व खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी बहुचर्चित वैभववाडी पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या छपराच्या कामाचा मुद्दा सदस्य मंगेश लोके यांनी उपस्थित केला. शासनाचे अडीज कोटी रुपये खर्च होऊनही इमारतीची गळती काढण्यासाठी पञाचे छप्पर काम मंजूर आहे. त्या कामाला सुरुवात का झाली नाही. असा प्रश्न लोके यांनी बांधकामचे उपअभियंता सुतार यांना केला. हाच मुद्दा पकडून अरविंद रावराणे यांनी संबंधित ठेकेदाराला आमच्या समोर बोलवा. त्याला आमचा हिसका दाखवितो.असा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री सडक योजनेतून करण्यात असलेले वेंगसर – मांगवली या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. शासनाचे कोट्यावधी रुपये वाया जात आहेत. त्यामुळे या कामाची चौकशी करावी.अशी मागणी श्री. लोके यांनी केली आहे. तर सोनाळी येथीलही काम अपूर्ण असल्याचे अरविंद रावराणे यांनी उपअभियंता पुरी यांच्या लक्षात आणून दिले आहे.
तालुक्यातील काही माध्यमिक शाळेत विदयार्थ्यांकडून फी घेतली जाते. याची चौकशी करावी. अशी मागणी गेल्या महिण्याच्या मासिक सभेत अरविंद रावराणे यांनी केली होती. त्यावर माध्यमिक शिक्षण विभागाकडून अशी कोणतीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही. असे उत्तर दिले आहे. यावर रावराणे संतप्त झाले. अधिकारी व विदयालयांचे साठेलोटे आहे. पैसे जमा करुन वाटून घेतात. आणि वर पुरावे नाही म्हणतात. हे योग्य नाही. काही मुलांच्या आईनी स्वतःचे मंगळसूञ गहाण ठेवून फी भरली आहे. तुम्हांला पुरावे हवेत तर पुरावेही देऊ असे सांगितले.

पंचायत समितीच्या गाडीला डिझेलसाठी पैसे नसल्यामुळे गाडी फिरवू शकत नाही. मग सभापती व गटविकास अधिकारी यांनी तालुक्यात फिरायचे कसे असा प्रश्न करीत गाडीच्या डिझेलसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी. अशी मागणी अरविंद रावराणे यांनी केली आहे.
वैभववाडी तालुक्यात कोरोनाचे 13 सक्रिय रुग्ण असल्याचे डॉ. अनिल पवार यांनी सांगितले. लसीकरण जवळपास 92 टक्के पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. उंबर्डे मेहबूबनगर मध्ये 625 जणांनी लसीकरण केले नाही तर कोळपे येथील 311 नागरिकांनी लसीकरण केले नसल्याचे त्यांनी सांगितले. कनिष्ठ अभियंता पदी पदोन्नती देण्यात आलेले सतीश रावराणे व सुहास सावंत यांचा सभागृहात सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील पाच पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी शिनगारे यांनी दिली. परंतु शाळा बंद करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापनचा असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − 4 =