कुडाळ
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ महालक्ष्मी सभागृह येथे शुक्रवार दि. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 वाजता भाजपा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राजन तेली यांनी दिली. तसेच येथील महाविकास आघाडीतील सत्ताधारी पालकमंत्री, खासदार, आमदार हे पोकळ आश्वासने देवुन जनतेची कायम दिशाभूल करीत असल्याचा आरोप ही त्यांनी केला.
कुडाळ भाजपा तालुका कार्यालय येथे राजन तेली यांनी ही पत्रकार परिषद घेतली यावेळी कुडाळ भाजपा तालुका अध्यक्ष विनायक राणे, जिल्हा महिला मोर्चा प्रमुख संध्या तेरसे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, शहर अध्यक्ष राकेश कांदे, बंड्या सावंत, राजेश पडते, रूपेश कानडे तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी राजन तेली यांनी सांगितले सदरच्या या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत.
केंद्रात महत्वाचे खाते मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ई सेवाश्रम व कणकवली मतदार संघातील सर्व सरपंचांचा विमा उतरवला या बद्दल आमदार नितेश राणे यांचा, बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अॅड. संग्राम देसाई व जिल्हा लसीकरणात राज्यात पहिला आल्याबद्दल व स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केंद्रात मिळालेल्या महत्वाच्या खात्याच्या माध्यमातून कोकणात जास्तीत जास्त रोजगार उद्योगधंद्यांची निर्मिती व्हावी या करिता प्रयत्नशील राहावे अशा सूचना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्या व त्या पद्धतीने काम सुरू झालेले आहे. या संधीचा लाभ घ्यावा. या दृष्टीने जिल्ह्यात एक फार मोठे ट्रेनिंग सेंटर सुरू होणार आहे. त्यासाठी २० एकर जागेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली असुन तो पर्यंत कुडाळ एमआयडीसी येथे हे ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येईल. खादी ग्रामोद्योग यासाठीही विशेष जागेची मागणी करण्यात आली असल्याचे ही त्यांनी सांगितले.
सुमारे ७० वर्षे जुना असलेला वजराट येथील हातमाग व्यवसाय सुरू रहावा व महीलांना रोजगार मिळावा या करीता तसेच कृषी क्षेत्रात किसान मोर्चाच्या माध्यमातून विविध प्रयोग सुरू करण्यात आले असल्याचे ही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय आहेत, विमानतळ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुरू केले मात्र विमानाकडे जाणार्या खड्डेमय रस्त्यासाठी तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर व आताचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार, आमदार यांनी काहीच केले नाही.
पावसाळा सुरू होताच बेडूक डराव डराव करतात त्याचप्रमाणे येथील शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार, आमदार हे आता नगरपंचायत व पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यावर अनेक घोषणा पोकळ घोषणा करीत आहेत. केसरकर यांनी तर पंधरा वर्षात एकही व्यवसाय आणला नाही. असा टोला त्यांनी लगावला.
कोणत्याही निवडणुका आता नसताना केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणचा विकास व्हावा या दृष्टीने या ठिकाणी येत आहेत. मात्र येथील सत्ताधारी, पालकमंत्री, खासदार, आमदार हे पोकळ आश्वासने देवुन जनतेची कायम दिशाभूल करीत आहेत. या जिल्ह्यातील जनतेला कोण वाली राहिलेला नाही आहे. त्यामुळे आशेचा किरण म्हणून येथील जनता राणेकडे बघत आहे.