You are currently viewing किती सुंदर आहे …

किती सुंदर आहे …

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

किती सुंदर आहे पहा पहा जगणं
किती सुंदर आहे पहा पहा जगणं…
त्या कुंदकळ्यांनी खळखळून हसणं
किती सुंदर आहे पहा जगणं…

ती प्राचीवरती रविकिरणांची आभा
अन् सायंकाळी रंगवितो नभा
केशर सांडते रंग किती ओघळती
ते क्षितीजा वरती रविकिरणांचं हसणं ….
किती सुंदर आहे पहा पहा जगणं….

त्या पाऊस धारा सोबतीस वारा
पाचोळा उडतो गगनी किती भरारा
पक्ष्यांची धांदल कधी कधी गारा
अन् आडोशाला साऱ्यांचं दडणं…..
किती सुंदर आहे पहा पहा जगणं….

ते प्रपात सुटती धबा धबा कोसळती
अन् सरिता धावत आनंदे गाती
तो पाचू पेरत पाऊस गातच सुटतो
अन् वसुंधरेचं मखमाली नटणं…..
किती सुंदर आहे पहा पहा जगणं….

आनंदे नांदा उपभोगा ना जीवन
ना येणार हो परतून पहा क्षण
नात्यात गोडवा दिला पहा आंदण
ही सृष्टी आहे आनंद कोंदणं….
किती सुंदर आहे पहा पहा जगणं….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 4 =