You are currently viewing खरी दिवाळी

खरी दिवाळी

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य ज्येष्ठ कवी, गझलाकार अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

खरी दिवाळी

कोण्या घरी सुकुमार होती एक मुलगी लाडकी
होती जरा चंचल परंतू गोड आणी बोलकी

एकदा हट्टून बसली आई दिवाळी ये कधी
खाऊ नवा कपडे नवे आणी फटाके ते कधी

आई वदे येतील बाबा घेवून सारे आज की
तू आता खेळावया जा कामे मला करुदेत की

होती घरा बाहेर तेथे झोपडी साधी सुधी
होती तिची मैत्रीण तेथे खेळावया येई कधी

रंगला मग मैत्रीणींचा खेळ तेंव्हा ती पुसे
आली दिवाळी तू कधी आणशील कपडे छानसे

ती वदे गहिर्याच नेत्री आमच्या घरी नसते दिवाळी
आई बाबांची सदाची रात्र पाळी दिवस पाळी

आली घरी मुलगी परंतू रुसली अबोल झाली
आले जरी बाबा घरी ना धावली ना बोलली

पाहुनी कपडे नवे ही ना तिची खुलली कळी
कोडे तिच्या पडले मनी ही कशी असली दिवाळी

बाबा मला कपडे नको मैत्रीण कोठे घालते?
खाऊ नको कांहीं नको मी मैत्रिणी सह खेळते

त्या दुपारी मैत्रीण येई खेळास तिज नेण्यावया
कपडे नवे लेवून अंगी अन कांहीं तरी सांगावया

बाबा तुझे घेवून आले कपडे मला देण्या घरी
खाऊ फटाके ही दिले करुया दिवाळी साजरी

धावली मुलगी तशी बाबांकडे बिलगावया
डोळ्यात पाणी साचले उरले न हीं सांगावया

हंसले जसे आई नि बाबा ती हंसे खुलली कळी
त्या निरागस चेहर्यावर ती खरी दिसली दिवाळी

आली दिवाळी सांगताना ती जशी भारावली
सांगताना कळत नकळत ही पापणी पाणावली

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा