सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन
कणकवली
महाराष्ट्रातील महाविद्यालये दिनांक 20/10/21पासून सुरु करण्यात आली परंतु ज्या विद्यार्थ्यांनी दोन डोस घेतले आहेत अशाच विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश असल्याने विद्यार्थ्यांची म्हणावी तशी उपस्थिती दिसून आली नाही म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे ,पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण महाराष्ट्रात’ मिशन युवा स्वास्थ्य’ राबविण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत सहसंचालक डॉ. संजय जगताप यांनी सर्व प्राचार्यांच्या सहमतीने हे मिशन दिनांक 25 /10 /21 ते 02/ 11/ 21 या कालावधीमध्ये यशस्वी करण्याचे ठरविले आहे. लसीकरण संदर्भातील विद्यार्थ्यांची आवश्यक असणारी माहिती सर्व महाविद्यालयांनी गुगल फॉर्म द्वारे संकलित केली आहे . सदर मिशन यशस्वी करण्यासाठी सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी सहकार्य करण्याचे ठरविले आहे. प्रत्येक जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर समन्वयक नेमलेले असून त्यांच्याद्वारे हे मिशन यशस्वी होईल अशी आशा आहे. संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी प्रा. डॉ. शिंत्रे (पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी ) यांच्यावर सोपविली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एकही लस घेतलेली नाही व ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण आहे व ज्या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या डोसचा कालावधी याचदरम्यान येत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील प्राचार्यांशी संपर्क साधावा .असे आवाहन कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.बी .चौगुले यांनी केले आहे.