*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांची काव्यरचना*
कोजागिरी पौर्णिमेला
रायगडावरी जाते
दूध विक्री करूनिया
हिरा परत निघते ||
काम संपता उशीर
सूर्य अस्ताचला जाई
होता गडाचा नियम
महाद्वार बंद होई ||
तान्हे बाळ घरी असे
जाण्या अडचण येते
जिद्द धरोनीया मनी
हिरा धाडस पेलते ||
नावाचीच हिरकणी
उतरली उभा कडा
मातृत्वाचा ओढीनेच
जिंकीयले रायगडा ||
कोजागिरीचा उत्सव
मातृत्व विजयी होई
हिरकणीचा बुरुज
गाणे वात्सल्याचे गाई ||
ज्योत्स्ना तानवडे. पुणे