सिंधुदुर्गनगरी
विजयादशमीनिमित्त ‘सह्याद्री प्रतिष्ठान’च्या ‘आधी तोरण गडाला, मग माझ्या घराला’ या उपक्रमाखाली दसऱ्यादिवशी सावंतवाडी येथील बांदा किल्ला येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने दुर्गपुजन आणि तोरण बांधणी करण्यात आले.जिल्ह्यातील दुर्गसेवक आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत उत्साहात हा कार्यक्रम झाला.
‘सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्तान’ या दुर्गसंवर्धनासाठी वाहुन घेतलेल्या शिवप्रेमींच्या संस्थेने यावर्षी विजयादशमीनिमित्त ‘आधी तोरण गडाला, मग माझ्या घराला’ हा उपक्रम राज्यभरात राबवला. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करताना गड, कोट, दुर्ग, किल्ले यांची डागडुजी, उभारणी याकडे विशेषत्वाने लक्ष दिले. एकेकाळी महाराष्ट्राचे वैभव असलेले हे गडकोट आज दुर्लक्षित झाले आहेत. या गडकोटांबाबत जनजागृती व्हावी, आपला देदिप्यमान इतिहास नव्या पिढीसमोर यावा, या हेतुने हे अभियान राबविण्यात आले. प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग विभागाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात विविध ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम त्याचाच एक भाग होता.
या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच आहे. काहीतरी केले पाहिजे, आपला इतिहास टिकवला पाहिजे, असे नेहमीच बोलले जाते. मात्र तशी कृती होताना दिसत नाही. हे लक्षात घेता ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ संस्थेने राज्यभरात अनेक ठिकाणी श्रमदान आणि सेवाभावी वृत्तीने निरपेक्षपणे अनेक गडकोटांचे संवर्धन करण्याचा वसा हाती घेतला आहे, हे उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या उपक्रमांना युवकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. गडकोटांच्या संवर्धनासाठी आणि जनजागृतीसाठी प्रतिष्ठान राबवित असलेले उप्रक्रम प्रशंसनीय आहेत, अशी प्रतिक्रीया श्री. सतीश लळीत यांनी दिली आहे.
या उपक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडकोट, छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारके, तोफा यांचे पुजन करण्यात आले. या सर्व उपक्रमाचे नियोजन सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग मालवण विभागाचे दुर्गसेवक सुनिल राऊळ, सदानंद देसाई,जयराम देसाई आणि रितेश राऊळ यांनी केले.
सह्याद्री प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग विभागाच्या गडसंवर्धन कार्यात श्रमदान रुपाने किंवा आर्थिक रुपाने कोणी सहभागी होऊ इच्छित असल्यास दुर्गसेवक विवेक गावडे (95457 28929) किंवा प्रमोद मगर (86983 87138) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. ही चळवळ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी सर्वांचे योगदान अपेक्षित आहे.