मळेवाड
लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व माहिती मिळावी यासाठी विधी सेवा प्राधिकरण कडून तालुक्यात गावोगाव जाऊन जनजागृती व माहिती उपक्रम राबविण्यात येत आहे. मळेवाड कोंडुरे गावात विधी सेवा प्राधिकरणचे नेमलेले अधिकारी ग्रामपंचायत मध्ये उपस्थित झाल्यानंतर त्यांचे उपसरपंच हेमंत मराठे व ग्राम विस्तार अधिकारी अनंत गावकर यांनी पुष्पुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी डी आर गावडे यांनी उपस्थित ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य यांना कायदेविषयक माहिती दिली.
यानंतर मळेवाड जकातनाका येथे कायदेविषयक जनजागृती करीता ग्रामस्थांची जनजागृति फेरी काढण्यात आली. यावेळी फेरी नंतर उपस्थित ग्रामस्थांना कायदेविषयक माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित ग्रामस्थांना विधि सेवा प्राधिकरणची कार्ये, प्राधिकरण करून कोणत्या व्यक्तींना मोफत विधी सेवा पुरविली जाते, विधी सहाय्य प्राप्त करण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करावा या सर्व सेवांची माहिती डी आर गावडे व विधी स्वयंसेवक जितेंद्र जाधव यांनी उपस्थित ग्रामस्थांना, अंगणवाडी सेविका व व्यापाऱ्यांना माहिती दिली.
यावेळी दुकानदार, रिक्षा व्यावसायिक, महिला यांना दशरथ गावडे, जितेंद्र जाधव, व शिपाई रमेश परवार यांनी कायदेविषयक माहिती पत्रके दिली. सदरचा उपक्रम हा सावंतवाडी दिवाणी न्यायाधीश आर आर बेडगकर व सह दिवाणी न्यायाधीश डी. बी. सुतार यांच्या मार्गदर्शाखाली घेण्यात आला.