जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचच्या सदस्या चेन्नई स्थित ज्येष्ठ लेखिका, कवयित्री सौ.भारती महाजन -रायबागकर यांचा अप्रतिम लेख
नवरात्राच्या साहित्य गरब्यातील रंगीत गोफाचा हा एक पदर…
एक असतं आटपाट नगर…त्या नगरातली एक नवीनच झालेली छोटीशी सोसायटी…राहायला आलेले सगळेच नवीन…फ्लॅट संस्कृतीशी हिची ऐकीव माहितीवर आधारित अशी पूर्वग्रहदुषित, पहिलीच ओळख…
त्यामुळे आधी एकमेकांना जोखण्यात…समोरासमोर प्रत्यक्ष भेट झाली तर ओठ किंचीत विलग करून हसण्यात…नंतर ‘कसं काय’ अशी जुजबी चौकशी करण्यात आणि नंतर मात्र व्यवस्थित ओळखी होण्यातले पहिले कांहीं दिवस…सोसायटी नवीन, त्यामुळे माणसांबरोबर अनेक समस्यांचीही ओळख…
मग त्या सोडवण्यासाठी सगळ्यांच्या अनेकदा गाठीभेटी, मिटिंग्ज, चर्चा, निष्पन्न, निष्कर्ष आणि या सगळ्यांच्या अनेक फेऱ्या…मग सगळ्यांतील कांही जणांच्या चर्चेचे उत्तरायण…आणि नंतर त्यातीलही कांही जणांची अंतःस्थ गुफ्तगू…
आणि ह्या सगळ्या घडामोडीत हिला भेटली… हिच्या वरच्या मजल्यावर राहणारी…प्रथम दर्शनी जिला पाहिल्यावर एक सुप्त, आकर्षणयुक्त भीतीच वाटणारी हो…भितीच…कारण डोळ्यांत भरण्यासारख्या सुंदर रूपाचा, आजपर्यंत कधीही न पाहिलेला मॉडर्न लुक असणारी…ऐन तारुण्यात लहान मुलीसह एकटं रहावं लागणारी…नोकरी करणारी…करारी स्वभाव असणारी…इंग्रजीवर प्रभुत्व असणारी आणि…बरंच कांही… त्यामुळे इतर शेजार्यांच्या तुलनेत सहज ठळक उठून दिसणारी अशी… *ती…*
या पार्श्वभूमीवर दोन मुलांची आई असलेली…साडी नेसणारी…एक वेणी घालणारी…एकंदरीत एक टिपिकल काकुबाई छाप गृहिणी असणारी आणि बाकीच्या इतर शेजाऱ्यांमध्ये सहज सामावली जाणारी अशी… *ही…*
अशा चुंबकाचे दोन विरुद्ध ध्रुव असलेल्या ह्या दोघीत मैत्री…? अशक्यच…हिचा मनाशी दृढनिश्चय…शक्य तितकं अंतर ठेवुन राहणं हेच श्रेयस्कर…पण…रोज नोकरीवर येता जाता मुद्दाम थांबुन बोलणं…कामवाल्या बाईसाठी घराची किल्ली ठेवणं आणि इतरही साध्या साध्या गोष्टींची चर्चा करणं…अशा अनेक कारणांनी तिच्याशी होणाऱ्या सहज साध्या गप्पांतुन हिच्या मनातला गैरसमज कधीच विरून गेला…*दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं* ह्याचा पुन्हा एकदा प्रत्यय…
आणि मग हळूहळू उलगडत गेलं तिच्या पोलादी व्यक्तिमत्त्वाच्या आत दडलेलं कोमल अंतरंग…सीमेवर पतीला आलेलं वीरमरण, लहानशा मुलीसाठी पुन्हा दुसरं लग्न न करणं…आणि कदाचित त्यासाठीच स्वतःभोवती उभारलेलं हे करारी बाण्याचं संरक्षक कवच…हळूहळू भिन्न स्वभावधर्माच्या या दोघींमधलं मिटत गेलं अंतर…चुंबकाचे विरुद्ध पोल एकमेकांकडे आकर्षित होतात अगदी तस्संच… तासन्-तास गप्पा, दोघींनी मिळुन खरेदीला, फिरायला जाणं, एकमेकींच्या मदतीसाठी तत्पर रहाणं…अर्थात तिच्यापेक्षा हिलाच मदत लागायची तिची…
स्वभाव आणि राहणीमानातही फरक असलेल्या त्या दोघींची ही अशी जिवलग मैत्री म्हणजे शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या कुतूहलाचा विषय…पण त्याची काय पर्वा…मनं जुळलीत नं…मग बस्स्…!
एरवी असं सगळं छान असायचं...अगदी सुरळीत…पण दिवाळीसारख्या प्रकाशाच्या सणाला मात्र तिच्या हसऱ्या मुखाआडचा अंधारी एकाकीपणा क्वचित एखाद्या वाक्यातुन व्हायचा उजागर…पण क्षणभरच…पुन्हा तिला म्हटलं की… *सखी शेजारिणी तू हसत रहा* तर लगेच तिच्या हास्याच्या फुलझड्या उजळायला तय्यार…
असं मस्त चाललं होतं त्या दोघींचं…आणि अचानक तिचा निर्णय…दुसऱ्या गावी जाण्याचा…नेहमीसाठीच…हिच्यासाठी तर ही शाॅकिंग न्यूज...झाल्या नं बाईसाहेब सैरभैर…कांही म्हणता कांही सुचेना… आणि ती… *गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा* अशी…हिच्यासारखं नाही… *गुंतुनी गुंत्यात साऱ्या पुन्हा पुन्हा तय्यार मी गुंतायला…*
एक दिवस…तिचं हिला बाय-बाय… आणि ही… बघतेय वाट… *अशी सखी* *शेजारिणी…पुन्हा मज भेटेल का कोणी…*
तर मंडळी…
स्त्रीच्या अनेक नात्यांना पुरून पुन्हा दशांगुळे उरणारी असते *सखी…*
जिवाभावाचं हितगुज करण्यासाठी असते *सखी…*
मनींचं गुपित विश्वासाने सांगण्यासाठी असते *सखी…*
चिमणीच्या दाताने खाऊ खाण्यासाठी असते *सखी…*
मैत्रिणीच्या आनंदात आपला आनंद मानणारी असते *सखी…*
राग-लोभ, हेवे-दावे, मोह-मत्सर या सर्वांचा वारा नसणारी असते *सखी…*
आणि…आता नवीन तंत्रज्ञानाच्या युगात…
समाज माध्यमांवर झालेल्या ओळखीला मैत्रीच्या दृढ बंधनात बांधणारी असते *सखी…*
सौ. भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334