You are currently viewing सावंतवाडीत नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात

सावंतवाडीत नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात

संपादकीय….

संजू परब किंगमेकरच्या भूमिकेत?

सावंतवाडीत दीपक केसरकरांच्या सत्तेला त्यांच्या विश्वासू व्यक्तीच्या वादीने सुरुंग लावून भाजपाचे संजू उर्फ सच्चिदानंद परब सावंतवाडीचे नगराध्यक्ष बनले. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या संजू परब यांनी आमदारकी हुकल्यावर नगराध्यक्षपदाची चालून आलेली संधी पदरात पाडून घेत सावंतवाडीकरना विकासाची नवी आश्वासने दिली. सावंतवाडी वासीयांनी देखील बदल घडतोय त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न होईल या आशेवर राहून केसरकरांच्या सत्तेला सुरुंग लावत नगरपालिकेत बदल घडवून आणला. नव्या नवरीचे नवलाईचे नऊ दिवस असल्यासारखे पहिले काही दिवस खरोखरच आशादायी वाटले, परंतु त्यानंतर मात्र अनुभवाच्या कमीमुळे सावंतवाडीत विकास शोधण्याची वेळ शहरवासीयांवर आली.
आमदार नितेश राणे यांनी नगरपालिका पोटनिवडणुकीत सावंतवाडी शहराची जबाबदारी घेत “उर्वरित राहिलेले ७०० दिवस आपल्याला सत्ता द्या, सावंतवाडीत विकासाची गंगा आणतो”. असे सांगत भुयारी गटार, कंटेनर थिएटर, २४ तास पाणी पुरवठा, देवगड वैभववाडी सारखा विकास करणार नगरपालिकेच्या कारभारावर आपले लक्ष असणार असे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र शहरवासीयांच्या पदरी निराशाच पडली. थिएटर कंटेनर मधून परदेशी गेलं, भुयारी गटार तर भुयारातच राहिले, आजपर्यंत शहरात दोन वेळ मुबलक पाणीपुरवठा होत होता परंतु सत्ता बदल झाल्यावर वरिष्ठ नगरसेवक असलेल्या सत्ताधाऱ्यानीच नगरपालिकेत कळशी वाजवत पाण्यासाठी आंदोलन केले, यावरून २४ तास पाण्याच्या आश्वासनाची काय गत झाली हे लक्षात येतंच. आमदार नितेश राणे यांनी निवडणुकीनंतर काहीच दिवसांनी अंतर्गत धुसफुशीमुळे सावंतवाडी नगरपालिकेतील लक्ष काढून घेतल्याने सावंतवाडीवासीयांवर फक्त देवगड, वैभववाडीचा विकास पाहण्याचीच वेळ आली.
पोटनिवडणुकी नंतर संजू परब यांची आमदार रविंद्र चव्हाण यांच्याशी झालेली जवळीक नितेश राणे यांना सावंतवाडी नगरपालिकेच्या राजकारणापासून दूर घेऊन गेली. त्यामुळे विकासाच्या नावावर भाजी मार्केटचा गोंधळ केला गेला, भाजी मार्केटची इमारत नव्याने आराखडा बनवून विकासाकाकडून बांधून घेणार, अशा कितीतरी वल्गना झाल्या. विकास म्हणता म्हणता शहरात मटक्याच्या अनेक टपऱ्या उभ्या राहिल्या. मटक्याच्या धंद्यातही काही पदाधिकारी उतरले, तर काही जणांनी पक्षाची पदे घेत आपल्या अवैध धंद्यांना सावरले. यात अनेकजण स्वतःचा उत्कर्ष करून गेले परंतु शहराचा उत्कर्ष मात्र करता आला नाही. आज वेंगुर्ला नगरपालिका भाजपच्या ताब्यात असताना शहर विकास डोळ्यासमोर ठेवत मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आणि पालकमंत्री उदय सामंत यांचा नगरपालिका नागरी सत्कार करते, कारण केवळ वेंगुर्ला शहराचा विकास. वेंगुर्ला शहरातील नेत्यांना त्यांच्या शहराच्या विकासासाठी विरोधी पक्षाचे नेतेसुद्धा महत्वाचे वाटतात, परंतु सावंतवाडीत स्वयंघोषित नेते मात्र पालकमंत्री, आमदार यांच्यावर कोणताही प्रोटोकॉल न पाळता टीका करतात आणि आपल्या वरीष्ठांपुढे चमकेगिरी करतात. परंतु चमकेगिरी करणारे शहराच्या विकासासाठी काय योगदान देतात का? याचा विचार भविष्याच्या दृष्टीने सावंतवाडी वासीयांनी करणे अत्यंत आवश्यक आहे. सावंतवाडीत केवळ टिकेचं राजकारण होते, इथे नगरपालिकेला इमारतीसाठी आराखडा बनवा, निधी देतो म्हणून पालकमंत्री सांगतात, तर त्याच्या बाबत विचार होत नाही, त्यासाठी प्रयत्न होत नाहीत, परंतु पालकमंत्री, आमदारांचे शहरासाठी योगदान काय? असा प्रश्न मात्र उपस्थित करतात.
सावंतवाडी येत्या नगरपालिका निवडणुकीत कदाचित नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण बदलण्याची शक्यता आहे, त्यामुळे संजू परब यांना पुन्हा संधी मिळणे कठीण आहे. परंतु सावंतवाडीत आपण विकास केला म्हणत शहरवासीयांना पुन्हा एकदा आपल्या सहकार्यांना निवडून आणून किंगमेकर बनून भविष्यात विधानसभेची तयारी करण्याची त्यांची मनीषा असणार. एकवेळ दीपक केसरकर यांनी १७/१७ जागा निवडून आणत शहराचे किंगमेकर ही भूमिका पार पाडलेली, त्याच दिशेने संजू परब यांचाही प्रवास सुरु असल्याचे दिसत आहेत. किंगमेकर म्हणून नगरसेवक निवडून आणून राणे कुटुंबियांच्या नजरेत आपले वजन वाढवायचे असा त्यांचा मनसुबा आहे. परंतु एकीकडे शहरात आजपर्यंत रस्त्यांची कार्पेटची सुद्धा झालेली कामे, भोसले उद्यानाची कंपाउंड वॉल, काशी शहाबुद्दीन हॉल नूतनीकरण, अशी जी काय छोटी मोठी कामे झाली ती बबन साळगावकर नगराध्यक्ष असताना मंजूर झालेली होती तीच पूर्ण झालीत, त्याव्यतिरिक्त नवीन अशी कोणती विकासात्मक कामे सत्ताधाऱ्यांनी केली? हा प्रश्न असून येत्या नगरपालिका निवडणुकीत लोकांसमोर जाताना त्याची उत्तरे द्यावी लागतील. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्यातील वादामुळे शहराचा विकास हा खुंटलेलाच आहे. त्यामुळे केसरकर v/s सामंत वाद दाखवून सावंतवाडी शहरवासीय मूर्ख नक्कीच बनणार नाही. कारण जिथे केसरकरांनी केलेली विकासात्मक कामे सहकाऱ्यांकडून होत नाहीत असे दिसताच सत्ता बदल केला तिथे सत्तेत आलेल्यांच्या भुलथापांवर शहरवासीय पुन्हा पुन्हा भरोसा ठेवणार नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा