You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वप्न….चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वप्न….चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण.

कोकणासाठी ऐतिहासिक क्षण

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वप्न असलेल्या चिपी विमानतळाचा आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मान. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ऑनलाईन येत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहिले. जिल्ह्याला विकासाकडे घेऊन जाणाऱ्या या अद्भुत सोहळ्याला देशातील, राज्यातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती हे देखील वाखाण्याजोगे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, केंद्रीयमंत्री रामदास आठवले, बाळासाहेब थोरात, दादा भुसे, सुभाष देसाई, अनिल परब, आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे, निरंजन डावखरे, दीपक केसरकर, वैभव नाईक, एमआयडीसी चे अधिकारी, आयआरबी चे अधिकारी, पोलीस महासंचालक आदी मान्यवर खास उपस्थित होते. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने कोकणावर प्रेम असल्याचे दाखवणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते दरेकर यांनी मात्र कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

खासदार विनायक राऊत यांनी सूत्रसंचालन करत सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आयआरबी चे संचालक म्हसकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. दिल्लीत विनीत सूद यांनी पुष्पगुच्छ देऊन केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी फलकाचे अनावरण करत तसेच दीप प्रज्वलित करून सिंधुदुर्ग विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय एकत्र येत कार्यक्रम पार पाडल्याबद्दल समाधान व्यक्त करत अनेकांच्या योगदानातून हे विमानतळ झाल्याचे सांगितले. जगातून लोक गोवा पहायला येतात, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समुद्रकिनारे, सौंदर्य त्याहूनही सुंदर असून जिल्ह्याच्या विकासाला कशी चालना देता येईल याचा अभ्यास करून जिल्हा विकासाकडे नेणार अशी ग्वाही दिली. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील जिल्ह्याच्या सौंदर्याची वाहवा करत सिंधुदुर्ग विमानतळ ही जिल्ह्याच्या विकासाची सुरुवात असल्याचे सूतोवाच केले. राज्यात पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत भविष्यातील विकासाच्या संकल्पना राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडल्या. खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात विमानतळासाठी जमीन देणाऱ्या भूधारकांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे १९९२ साली तेव्हाचे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री माधवराव सिंधिया यांनी विमानतळासाठी जागेची पाहणी केली होती आणि आता त्यांचेच चिरंजीव व केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या काळात लोकार्पण झाल्याची आठवण ताजी केली. त्याचबरोबर २००९ साली शिवसेना युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते आणि विद्यमान शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होत असल्याचे आवर्जून सांगितले. मंत्री सुभाष देसाई यांनी प्रास्ताविक करताना शिवसेना सत्तेत असताना विमानतळ पूर्ण झाले यासाठी शिवसेनेचा पायगुण असे सांगत चिमटा काढला.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी भाषणात जोरदार फटकेबाजी करत येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत देखील केले. विमानतळाचे उद्घाटन झाले पण विमानतळाकडे येण्यासाठीचे रस्ते खड्डेमय असून त्यासाठी निधी देण्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना आवाहन करतानाच राज्यातील परिस्थितीवर टिका केली. विमानतळ भूमिपूजन साठी आपण व सुरेश प्रभू आलेलो असताना बाहेर आंदोलने केली होती, विमानतळ नको म्हणून नारे देत होते, सी वर्ल्ड होऊ दिला नाही, ते कोण होते? आज व्यासपीठावर देखील तेच आहेत असे सांगत विरोधकांवर आसूड ओढले. राणेंनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी करून जिल्ह्यातील लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा मानस व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रमात नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांकडे कटाक्ष देखील टाकला नाही हे देखील लक्षात घेण्यासारखे होते. शिवसेनेत असताना आपण जिल्ह्याचा विकास केला हे सांगतानाच बाळासाहेबांना खोटे बोलणारी माणसे आवडत नव्हती तेव्हा उद्धवजी तुम्ही आपल्या सहकाऱ्यांकडे लक्ष द्या, एखादी व्यक्ती ठेऊन सहकारी काय करतात यांची माहिती घ्या असेही उद्धव ठाकरे यांना नारायण राणे यांनी आवाहन केले.
केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ऑनलाईन उपस्थित राहत मराठीतून भाषण करत सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. शिंदे, गायकवाड आदी मराठा घराण्यांच्या इतिहासाची आठवण करून देत कोकण आणि आपले पारिवारिक संबंध असल्याने हा सोहळा म्हणजे आपल्यासाठी भावुक क्षण आहे असे सांगत इतिहास जागा केला. हे उद्घाटन नसून कोकणच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली असून आपले दिवंगत वडील माधवराव सिंधिया यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगत महाराष्ट्र सरकार व एमआयडीसी ला शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात प्रथम केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची स्तुती करताना, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, शिर्डी इत्यादी विमानतळा बाबत स्वतःहुन बैठकीसाठी वेळ मागून घेतली यावरून त्यांची तळमळ दिसून येते असे सांगत एकत्र येत महाराष्ट्राचा विकास करू असे सांगत भविष्यात सिंधुदुर्ग विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा करावा असे आवाहन केले. त्याचप्रमाणे याठिकाणी एक हेलिपॅड उभारून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांना हेलिकॉप्टर मधून सैर करत विजयदुर्ग, मालवण आदी किल्ले आणि जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्याचे दर्शन घडवून जिल्ह्याचा विकास साधावा असेही आवर्जून सांगितले. नारायण राणे यांनी बोललेला बाळासाहेबांना खोटं आवडत नव्हतं, ते खोटं बोलणार्यांना बाहेरचा रस्ता दाखवत होते हा मुद्दा पकडून उद्धव ठाकरे यांनी पलटवार करताना बाळासाहेब यांनी खोटं बोलणाऱ्यांना तेव्हाच शिवसेनेतून काढून टाकल्याचे सांगत राणेंवर कुरघोडी केली. लोकार्पण सोहळा हे भाषणाचे व्यासपीठ नाही परंतु एखादा काळा टीका असलाच पाहिजे असा चिमटा काढत विषय आले म्हणून बोलावं लागलं असे सांगत नारायण राणेंच्या पेढ्याच्या गोडी या विषयावरही शरसंधान केले. कोकणची महती सौंदर्य जगात पोचलं की जगभरातून लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील त्यासाठी इथला विकास आणि सुविधा निर्माण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे वाचन देत सर्वांचे आभार मानले.
खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना सिंधुदुर्गात येण्याचे निमंत्रण दिले आणि सिंधिया यांनीही तात्काळ मान्य केले. दिल्लीवरून जॉईंट सेक्रेटरी उषा पादी यांनी सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांचे त्यांनी विशेष करून मराठीमध्ये आभार मानले, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यासपीठावरून उपस्थित मान्यवरांचे आभार मानत सोहळा संपल्याचे जाहीर केले. या सोहळ्यासाठी खास उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना आर्ट कॉलेजच्या मुलांनी तयार केलेले सन्मानचिन्ह (मेमेंटो) देऊन सन्मान केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा