You are currently viewing “सुसाईड नोट” ठेऊन बेपत्ता झालेल्या बँक अधिकाऱ्याचा बनाव?….प्रशासकीय यंत्रणेला ताप..

“सुसाईड नोट” ठेऊन बेपत्ता झालेल्या बँक अधिकाऱ्याचा बनाव?….प्रशासकीय यंत्रणेला ताप..

प्रकरण दाबणार की गुन्हा दाखल होणार?

संपादकीय….

सावंतवाडीतील खाजगी बँकेचा अधिकारी आत्महत्या प्रकरण गेले आठ दिवस गाजत होते. आपली कार ओटवणे गावी ठेवत आत्महत्या करत असल्या बाबत चिठ्ठी लिहून त्यात अन्य चार मित्रांनी पैसे ठकवल्याचे कारण देत बेपत्ता असलेल्या कारीवडे येथील मनोहर गावडे यांचा दोन दिवस नदीपात्रात, जंगलात शोध घेऊनही ते सापडून आले नव्हते. तेव्हाच त्यांनी आत्महत्या केली नसून आत्महत्येचा स्टंट असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी काहीच सुगावा न लागल्याने ते बेपत्ता असल्याचे पोश्टर लावून जाहीर केले, त्यानंतर सात दिवसांनी बेपत्ता असलेले मनोहर गावडे आपल्या राहत्या घरी प्रकट झाले होते. आपण कर्जाऊ दिलेले पैसे वसूल होत नसल्याने आत्महत्त्या भासवून पैसे वसूल करण्याचा त्यांचा मानस एकंदरीत प्रकरणावरून दिसून आला.
एका बँकेचे उपव्यवस्थापक असलेले सुशिक्षित अधिकारी जर स्वतःच्या स्वार्थासाठी अशा प्रकारे आत्महत्येचा बनाव करून संपूर्ण शासकीय यंत्रणेला, आपल्या जीवाची बाजी लावून सामाजिक बांधिलकी म्हणून नदी, जंगल, दर्याखोऱ्यात उतरणाऱ्या बाबल आलमेडा आणि त्यांच्या रेस्क्यू टीमला नाहक वेठीस धरायला लागले तर तो नक्कीच गंभीर गुन्हा आहे. कोरोनाच्या काळात आपली कर्तव्य बजावताना मेटाकुटीस आलेली पोलीस यंत्रणा विनाकारण दोन तीन दिवस आपली महत्वाची कामे बाजूला सारून केवळ एका व्यक्तीने आत्महत्या केली म्हणून त्याच्या शोधात होती. सात दिवसांनी शोधूनही न सापडलेले मनोहर गावडे स्वतःच पायी चालत घरी आले त्यामुळे त्यांनी केलेला बनाव उघड झाल्याने पोलीस खात्याकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार की प्रकरण दाबले जाणार असा सवाल सर्वसामान्य लोकांना पडला आहे.
रात्रभर गाडी ओटवणे येथे लावून बाजूच्या जंगलात झोपले, त्यानंतर दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, पण मुले आणि पत्नीचा विचार करून निर्णय बदललेल्या मनोहर गावडेंनी पूर्वनियोजित जंगलात राहण्याचा बेत केला होता का? आत्महत्या करणारी कोण व्यक्ती स्वतःसोबत बिस्कीट पुडे आणि पाण्याची बाटली घेऊन जाईल का? सात दिवस जंगलात राहिलेली व्यक्ती केवळ बिस्कीट पुडा खाऊन संपूर्ण जंगल ओटवणे ते आंबोली, माडखोल पालथे घालत चालत घरी येईल का? एवढे अंतर चालण्यासाठी लागणारी ऊर्जा बिस्किटांमध्ये असते का? सहा सात रात्र रात्र जंगलात झोपलेली व्यक्ती काय अवस्थेत असणार? असे अनेक प्रश्न मनोहर गावडे यांच्या जंगल सफारीवर उपस्थित होत आहेत.
मनोहर गावडे यांनी सांगितल्यानुसार त्यांनी बँकेकडून दहा लाख रुपये गृहकर्ज घेतले होते, परंतु ते पैसे त्यांनी मित्रांना कर्जरूपी दिले, मग घर बांधणीसाठी पैसे कुठून आणले? बँक गृहकर्ज देताना घराचे काम होते की नाही याची शहानिशा करत नाही का? बँक कर्मचार्यांकरिता कमी व्याजदराने उपलब्ध होणारे कर्ज घेऊन ते जास्त व्याजाने बाहेर मित्रांना देऊन पठाणी व्याज पद्धत अवलंबून बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा दुरुपयोग तर होत नाही ना? अलीकडे जिल्ह्यात बरेच लोक पैशांच्या हव्यासापोटी गोवा राज्यात खेळण्यासाठीही जातात, त्यामुळे तसा काही प्रकार तर होत नसेल ना? असे एक ना शेकडो प्रश्न मनोहर गावडे यांच्या सुखरूप घर वापसी नंतर उपस्थित होऊ लागले आहेत.
मनोहर गावडे बेपत्ता झाल्यानंतर कारीवडे व सोनूर्ली येथील काही महिलांनी पोलीस स्टेशनला दिलेली धडक आणि चिठ्ठीत नाव लिहिलेल्या पैसे थकविलेल्या चार लोकांना अटक करण्यासाठी केलेली मागणी यावरून केवळ पैसे वसूल होणे एवढाच उद्देश दिसून येत आहे. कर्जाऊ दिलेले पैसे देत नसल्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असे सांगणारे मनोहर गावडे सात दिवस होते कुठे? त्यांनी हा बनाव करून सरकारी यंत्रणा का वेठीस धरली? पैसे वसूल होत नव्हते तर सरळमार्गी पोलिसांची मदत का घेतली नाही? असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत असून स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारी यंत्रणा वेठीस धरणाऱ्या मनोहर गावडे यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर सुशिक्षित लोक अशाप्रकारे स्वतःच्या स्वार्थासाठी प्रत्येकवेळी सरकारी यंत्रणेचा वापर करू लागले तर समाजात भविष्यात हीच परंपराच सुरू होणार आणि कोणीही उठून हे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करणार नाही का? सर्व बाबींचा विचार केला असता सुशिक्षित असणाऱ्या परंतु सरकारी यंत्रणेस वेठीस धरणाऱ्या मनोहर गावडे यांच्यावर गुन्हा दाखल होणार की प्रकरण दाबले जाणार? असा सवाल उपस्थित झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा