You are currently viewing पितृपक्ष….
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

पितृपक्ष….

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांचा अप्रतिम लेख

आपले पूर्वज म्हणजे आपले पितर ..त्यांचे स्मरण करावे,
आठवावे,त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी,त्यांना विस्मरणात जाऊ देऊ नये..कारण त्यांच्या मुळेच आज
आपले अस्तित्व आहे याची जाण ठेवून त्यांच्या प्रति
कृतज्ञता व्यक्त करण्याचे दिवस म्हणजे हा पितृ पंधरवाडा
असतो.पूर्वजच काय ,आपल्याला घडवणाऱ्या , संस्कार
करणाऱ्या प्रत्येकच व्यक्तीविषयी आपण कृतज्ञच राहिले
पाहिजे असे आपली संस्कृतीच आपल्याला सांगते….

आपल्या पूर्वजांप्रती आदराने ,श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध !
यातली श्रद्धा फार महत्वाची आहे …श्रद्धा, भक्ती, विश्वास
या त्रयीला आपल्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे.
ह्या तीन गोष्टी जीवनात नसतील तर…?..जीवनाचा मूलाधारच
निघून जाईल. आई वडील आजी आजोबा यांचा आपल्या
जीवनावर एवढा प्रभाव असतो की, आपण त्यांचे अनुकरण
करतो ,तसेच वागण्याचा प्रयत्न करतो,इतकी आपली त्यांच्या
वर श्रद्धा असते.किंबहूना ते आपले आदर्श असतात, त्यांचा
आपल्याला अभिमान असतो.. इतका की, त्यांच्या विषयी
कुणी बरंवाईट बोललेलंही आपल्याला खपत नाही इतके ते
आपल्या जीवनात मुरलेले असतात, हे आपल्या लक्षातही
येत नाही.

ईश्वरावर श्रद्धा असावी ,अशी श्रद्धा आपली , आई वडील
गुरू आजी आजोबा यांच्यावर असते, त्यांच्या शिवाय
आपले पान ही हलत नाही, इतके आपण त्यांच्यावर
अवलंबून असतो.कारण आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे
उत्तर त्यांच्या जवळ आहे याची आपल्याला खात्रीच असते
व तसा अनुभव वारंवार आपल्याला आलेला असतो. कोणत्याही संकटातून ते आपल्याला सोडवतात, प्रसंगी
परिस्थितीशी दोन हात करतात, अटीतटीचा सामना करून
खडतर परिस्थितीतून ते आपल्याला बाहेर काढतात.
व समाधानाचा नि:श्वास सोडतात. व आपल्यालाही हायसे
वाटते की , त्यांच्यामुळेच कठीण परिस्थितीवर आपण मात
करू शकलो. हे सारे घडत असते, आपण त्यातून जात असतो,
पहात असतो, शिकत असतो व दिवसेंदिवस मग आपली
त्यांच्या प्रती असलेली श्रद्धा ही वाढत असते.

या श्रद्धे बरोबर त्यांच्यावरील विश्वासही वाढीला लागलेला
असतो व मग आपण त्यांच्या भरवशावर निश्चिंत होऊन जातो.
ते जोवर आपल्या पाठीशी आहेत तोवर कुणीही आपले वाकडे
करू शकत नाही,म्हणून आपण सुखाने जगत असतो कारण
संकट आले तरी त्यातून सोडवणारा आपलाच आहे , दुसऱ्या
कुणाकडेही आशेने डोळे लावून बसायची गरज नाही हे
आपल्याला माहित असते, इतके आपण आश्वस्त असतो.

त्या मुळे ह्या आपल्या जीवनाधार , पाया असलेल्या व्यक्ती
कारणपरत्वे जरी आपल्याला सोडून गेल्या तरी क्षणभर
आपल्यावर आकाश कोसळते व आपण हवालदिल होऊन
जातो. डोळ्यांसमोर अंधार पसरून काही काळ आपण गलित
गात्र होतो.. गोंधळतो, आपल्याला रस्ताच सापडत नाही..
आपला जीवनप्रवाह थांबला की काय? असे वाटून आपण
भयभीतही होतो. पण काळ मोठा महान आहे. जखमा कितीही
मोठ्या असल्या तरी तो भरून काढतो. व्रण राहतात पण
कालांतराने ते ही नष्ट होतात .

पण ह्या व्यक्ती मनातून कधी ही जात नाहीत .आपल्या मनातील त्यांचे स्थान अगदी अढळ असते.दररोज जरी
आठवण आली तरी रोज चर्चा होत नाही, ते शक्य ही नसते.
मग कृतज्ञता , प्रेम , आदर ह्या सर्व भावनांचा परिपोष ह्या पंधरवाड्यात होतो असे म्हणू या फारतर ….१५ दिवस
घरोघर हीच चर्चा असते, जणू हे १५ दिवस पितरांसाठी
राखीव असतात म्हणा ना ….!घरोघर भक्तीभावाने पितरांची
पूजा होते. त्यांच्या आवडीचे पदार्थ बनतात. आपल्या संस्कृतीत होमहवन यज्ञयाग यांना पूर्वीपार महत्व आहे.
अग्नी मार्फत ह्या सर्व गोष्टी केल्या जातात त्या आज ही
आपण करतो.हा सर्व श्रद्धा व संस्कारांचा भाग आहे. ज्यांना
पटत नाही त्यांनी करू नये. व्यक्ती स्वातंत्र्य आहे.

विज्ञान किती ही पुढे गेले तरी संस्कार टाकून दिले जात
नाही .अध्यात्म रूढी परंपरा व विज्ञान समांतर चालण्याचा
प्रयत्न करतात . इथे कुणी ही कुणाला मागासलेले म्हणण्याचे
कारण नाही कारण जोवर तुमच्यावर हे संस्कार आहेत तो पर्यंत ह्या गोष्टी अपरिहार्य आहेत .आणि कुठेतरी माणसाला
ज्यांच्यावर श्रद्धा आहे अशा परमेश्वराचे आई वडिलांचे गुरूचे अधिष्ठान लागते, ……..
नाही तर तो संकटात डगमगतो..… म्हणून ही सारी श्रद्धास्थाने
जीवनात असावी लागतात त्या शिवाय माणूस तग धरू शकत नाही. आणि मग अशा श्रद्धा स्थानांची पूजा , उतराई होणे
याची माणसाला गरज वाटून अशा परंपरा निर्माण होतात .
त्यातल्या डोळस आपण घ्याव्यात बाकी सोडून द्याव्यात हेच
खरे आहे .

कदाचित उतराई होण्यासाठीच ही पितृपक्षाची परंपरा निर्माण
झाली असावी असे वाटते. हो.. नद्यांच्या काठी संस्कृती
निर्माण होऊन माणूस जसा सूर्य , नदी , नाग साप यांची ही
पूजा करू लागला उपकार कर्ते या अर्थाने ….
(ही फक्त माझी मते आहेत, त्यांच्याशी कुणी सहमत
व्हावेच असा माझा आग्रह नाही ).धन्यवाद !

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =