You are currently viewing शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच वर्षी सुरू करण्यासाठी सर्वच राजकीय नेतृत्वाने प्रयत्न करा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच वर्षी सुरू करण्यासाठी सर्वच राजकीय नेतृत्वाने प्रयत्न करा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीची मागणी

सावंतवाडी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग याला मिळालेली मान्यता ४८ तासातच रद्द झाली. हे मेडिकल कॉलेज यावर्षीच सुरू व्हावे यासाठी आता सर्व राजकीय लोकप्रतिनिधीनी आणि प्रशासनाने एनएमसी ने निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटी दिलेल्या विहित वेळेच्या आधी पूर्ण करावेत आणि याच वर्षी पासून मेडिकल कॉलेजची पहिली बॅच सुरू व्हावी अशी आपली इच्छा असल्याचे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती च्या वतीने समन्वयक अँड. शामराव सावंत यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले की, हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच वर्षापासून सुरू होण्यासाठी आमचा जनरेटा असाच सुरू राहणार असून, येत्या काही दिवसातच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेतृत्वाची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा निर्माण होऊन जिल्हा वासीयांच्या आरोग्यविषयक प्रश्न कायम स्वरुपी सुटावे यासाठी सर्वपक्षीय नेतृत्वाने प्रयत्न करावेत असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे इतर वैद्यकीय महाविद्यालय प्रमाणे सर्वोत्तम चिकित्सा येथे उपलब्ध होणार आहेत. परंतु, मंजूरी मिळालेले महाविद्यालय ४८ तासातच नामंजूर झाल्याने जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसह कृती समितीच्या सदस्यांचा देखील हिरमोड झाला आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले की, १२ सप्टेंबर रोजी वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशासाठी लागणारी नीट परीक्षा संपन्न झाली असून, तिचा निकाल अंदाजे ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो. तसेच त्यानंतर अवघ्या १० – १५ दिवसात वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे एन एम सी ने काढलेल्या त्रुटी दूर करून तातडीने एन एम सी ची मान्यता पुन्हा मिळवण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी अँड शामराव सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी कृती समितीचे लक्ष्मण नाईक, अँड्रु फर्नांडिस, शुभम घावरे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा