You are currently viewing तालुक्यात शाखा नसलेल्या बँकेत खाते उघडण्याची सक्ती नको : या निर्णयाला ग्रामपंचायतींचा तीव्र विरोध

तालुक्यात शाखा नसलेल्या बँकेत खाते उघडण्याची सक्ती नको : या निर्णयाला ग्रामपंचायतींचा तीव्र विरोध

अन्य बँकेत खाते उघडण्याची मुभा द्या : भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

वैभववाडी
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीसाठी आयसीआयसीआय बँकेत खाते उघडण्याची ग्रामपंचायतीला सक्ती करण्यात आली आहे. मात्र वैभववाडी तालुक्यात या बँकेची शाखा नाही. त्यामुळे या बँकेत खाते उघडण्यास वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींचा तीव्र विरोध आहे. तालुक्यात शाखा असलेल्या अन्य राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणेची मुभा देण्यात यावी. अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.

15 व्या केंद्रीय वित्तआयोग अंतर्गत प्राप्त होणारे अनुदान याचे बचत खाते हे आयसीआयसीआय बँकेत उघडण्याचे ग्रामपंचायतींना आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत. सदर बँकची शाखा कणकवली येथे आहे. आयसीआयसीआय बँक शाखेमध्ये खाते उघडणे बाबत सक्तीचे केले आहे. याबाबत तालुक्यातील सरपंचानी नाराजी व्यक्त केले आहे. आयसीआयसीआय बँकेची शाखा वैभववाडी तालुक्यात नाही.

त्यामुळे बॕक व्यवहारासाठी सरपंच, ग्रामसेवक यांना कणकवलीला हेलपाटे मारावे लागणार आहेत. वैभववाडी तालुका हा दुर्गम तालुका आहे. तालुक्यामध्ये ब-याच सरपंच या महिला आहेत. त्यामुळे सदरची बाब ही महिला सरपंचांना गैरसोयीची ठरणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील ग्रामसेवकांकडे दोन-दोन ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे कणकवली येथे जाण्यासाठी त्यांचा वेळ वाया जाणार आहे.

परिणामी याचा विकास कामावर विपरित परिणाम होणार आहे. आयसीआयसीआय बँक शाखा वैभववाडी तालुक्यामध्ये सुरू करा. त्यानंतरच अंमलबजावणी करा. वैभववाडी तालुक्यामध्ये उपलब्ध असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते उघडण्यास सरपंच लोकप्रतिनिधी यांची कोणतीही हरकत नाही. त्या गैरसोयीच्या बँकेत खाते उघडण्याची जबरदस्ती केल्यास त्याला तीव्र विरोध राहणार आहे. असे निवेदनात नासीर काझी यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा