कुडाळ :
गणेश विसर्जन करून पाण्यात पोहताना कुडाळ येथील भंगसाळ नदी मध्ये मुंबई प्रभादेवी येथे वास्तव्यास असणाऱ्या ६५ वर्षीय दत्ताराम बाळू बेंद्रे यांचे पाण्यात बुडून निधन झाले.
कुडाळ शहरातील भैरववाडी मंदिर नजीक असलेल्या अभय गणपत राऊळ यांच्या निवास्थानी विराजमान झालेल्या गणेशाचे आज अकरा दिवसांनी विसर्जन होते. या विसर्जनासाठी त्यांचे मुंबई प्रभादेवी येथील मित्र दत्ताराम बेंद्रे हे आले होते. दुपारी गणेशाचा महाप्रसाद करून गणेशाचे विसर्जन करण्यासाठी अभय राऊळ यांचे कुटुंबीय तसेच त्यांचे मुंबई येथील सर्व मित्र भंगसाळ नदीच्या ठिकाणी विसर्जनासाठी गेले.
त्या ठिकाणी विसर्जनासाठी मदत करणारे शेलटे व अभय राऊळ यांचे मुंबईतील मित्र गणेशाची मूर्ती घेऊन पाण्यात उतरले आणि गणपतीचे विसर्जन केले. विसर्जन झाल्यावर दत्ताराम बेंद्रे हे पाण्यात पोहत असताना अचानक गटांगळ्या खाऊन बुडाले तेथे असलेल्या शेलटे यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याबाहेर काढून कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे त्यांना उपचारासाठी दाखल केले असता तत्पूर्वी त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.