You are currently viewing 10 वी, 12 वी पुरवणी परीक्षेबाबत जिल्हा दक्षता समितीची सभा संपन्न

10 वी, 12 वी पुरवणी परीक्षेबाबत जिल्हा दक्षता समितीची सभा संपन्न

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांच्यामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा घेण्यात येत आहे.  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा गुरुवार दि. 16 सप्टेंबर ते सोमवार दि. 11 ऑक्टोबर 2021 या कालावधीत एस. एम. हायस्कूल कणकवली आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी या केंद्रावर परीक्षा होत आहेत. तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा बुधवार दि. 22 सप्टेंबर ते शुक्रवार दि. 8 ऑक्टोबर 2021 या दरम्यान एस. एम. हायस्कूल कणकवली  आणि कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी या केंद्रावर परीक्षा होणार आहे.

माहे-सप्टेंबर/ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या बोर्ड पुरवणी परिक्षेच्या आयोजनाबाबत दक्षता समितीची सभा आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत परीक्षेच्या संपूर्ण आयोजनाबाबतचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. मुख्‍य कार्यकरी अधिकारी प्रजित नायर यांनीही या सभेला मार्गदर्शन केले. जिल्ह्यात या परीक्षेसाठी कणकवली व सावंतवाडी ही दोन केंद्र असून, इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षेसाठी 26, तर इयत्ता 10 वी पुरवणी परीक्षेसाठी 22 असे एकूण 48 विद्यार्थी या बोर्ड पुरवणी परीक्षेला बसणार आहेत. या परीक्षा दरम्यान शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (निरंतर) या दोन भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी एस. टी. महामंडळाकडून बसेसची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार असून, परीक्षा कालावधीत वीज पुरवठा सुरळीत राहण्याबाबत वीज वितरण कंपनीलाही कळविण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्तही पुरविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या परीक्षेत कोविड-19 च्या नियमांचे पालन करण्यासाठी परीक्षा केंद्र संचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, माध्यमि‍क शिक्षणाधिकारी सुनिल मंद्रुपकर, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, निरंतर शिक्षण विभागाचे प्रमोद म्हैंदरकर, डाक विभागाचे उपअधिक्षक व्ही.एन. कुलकर्णी, पोलिस विभागाच्या ए.पी.आय. कल्पना शिरदावडे, जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक संस्थेच्या प्राचार्या अनुपमा तावशीकर आदी दक्षता समिती सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =